पश्चिम भागातील ३५ गावांतील जमीन मोजणीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:14+5:302021-09-08T04:15:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्यात १७३ किलोमीटर रिंग रोडसाठी भूसंपादन सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्यात १७३ किलोमीटर रिंग रोडसाठी भूसंपादन सुरू आहे. पुण्याच्या पश्चिम भागातील ३७ पैकी ३५ गावांतील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. आता पूर्व रिंग रोडच्या ४६ गावांतील जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये चिंबळी, गराडे, सोनोरी, पेरणे, तुळापूर आणि उर्से या पाच गावांतील एकूण १३ टक्के मोजणी पूर्ण झाली आहे.
पूर्व भागातील रिंग रोडसाठी मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर, या पाच तालुक्यांतील ४६ गावांत भूसंपादन करण्यात येणार आहे. एकूण ८६० हेक्टर जमीन यामध्ये घेण्यात येणार आहे. मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यातील पाच गावांतील १०७ हेक्टर (१३ टक्के) मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
पीएमआरडीएच्या प्रारूप आराखड्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे रिंग रोडसाठी आवश्यक जागेव्यतिरिक्त सर्व्हिस रस्त्याची मोजणी कशी करायची, हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे चांदखेड आणि केळवडे या दोन गावांची मोजणी रखडली आहे. ती लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे एमएसआरडीसीचे उपअभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.
---
पश्चिम रिंग रोडच्या दोन गावांतील मोजणी रखडली
पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणने (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा (डीपी) जाहीर केला आहे. मात्र, त्यात पश्चिम रिंग रोडच्या मार्गावर दोन्ही बाजूंना १८ मीटर सर्व्हिस रस्त्यांचे आरक्षण टाकले आहे. नक्की किती जागा आरक्षित करणार आणि त्याचा मोबदला कोण देणार आहे. हे अद्याप स्पष्ट न झाल्याने चांदखेड आणि केळवडे या दोन गावांतील मोजणी रखडली आहे.