जमीन मोजणीसाठी भू-करमापकाने मागितली लाच; आरोपीसह एकाला अटक, ACB ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:35 AM2024-06-22T10:35:29+5:302024-06-22T10:35:51+5:30
दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे....
पुणे : जमीन मोजणी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील भू-करमापकाने तब्बल ४ लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तडजोडीअंती भू-करमापकातर्फे ५० हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.
दौलत मधुकर गायकवाड (३५, भू-करमापक, हवेली कार्यालय) याच्यासह खासगी व्यक्ती योगेश्वर राजेंद्र मारणे (२५, रा. एरंडवणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांनाही एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत ३१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची देहूगाव येथे जमीन आहे. ती जमीन मोजणीसाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ते हवेली भूमी अभिलेख कार्यालयातील करमापक गायकवाड यांच्याकडे गेले होते. त्यावेळी गायकवाड याने तक्रारदारांना ४ लाखांची मागणी केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली. त्यामध्ये खासगी व्यक्ती मारणे याने गायकवाड याच्या सांगण्यावरून तक्रारदार यांचे काम करून देण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. एसीबीने केलेल्या सापळा कारवाईत मारणेला ५० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानुसार पथकाने भू-करमापक दौलत गायकवाड आणि योगेश्वर मारणे दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांनुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.