‘थर्टी फर्स्ट’च्या मध्यरात्रीपर्यंत जमिनीचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:11+5:302021-01-01T04:08:11+5:30

सुषमा नेहरकर- शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे गेल्या चार महिन्यांत ...

Land transactions until midnight on Thirty First | ‘थर्टी फर्स्ट’च्या मध्यरात्रीपर्यंत जमिनीचे व्यवहार

‘थर्टी फर्स्ट’च्या मध्यरात्रीपर्यंत जमिनीचे व्यवहार

Next

सुषमा नेहरकर- शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे गेल्या चार महिन्यांत पुण्यातल्या दस्त नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. एकट्या डिसेंबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट म्हणजे तब्बल ३८ हजार १५७ दस्त नोंदणी होऊन शासनाला ७ कोटी ९८ लाख रुपयांचा महसूल मिळाला. वर्षाच्या शेवटच्या रात्री म्हणजे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरु असल्याने अंतिम आकडा वाढणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे बांधकाम क्षेत्रात आलेल्या मंदीला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यात मुद्रांक शुल्कात दोन टप्प्यांत सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत तीन टक्के, तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत दोन टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी गुरुवारी (दि. ३१) दुय्यम निबंधक कार्यालये गर्दीने फुलून गेली होती.

चौकट

कोरोना काळात ३३ कोटी ९७ लाखांचा महसूल

मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मार्च ते मे हे तीन महिने शहरातील दस्त नोंदणी पूर्ण ठप्प होती. मात्र दस्त नोंदणीतल्या सवलतीमुळे या तीन महिन्यांची तुट काही अंशी भरून निघाली. जानेवारी ते ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंतची पुण्यातली दस्तनोंदणी १ लाख ८५ हजार ५५२ वर पोहोचली. यातून शासनाच्या तिजोरीत ३३ कोटी ९७ लाख रुपयांची भर पडली. ‘थर्टी फर्स्ट’च्या मध्यरात्रीपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार चालू असल्याने अंतिम आकडा यापेक्षा वाढणार आहे.

चौकट

सवलत घेताना कोरोनाचे नियम धाब्यावर

मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी केली. यावेळी सुरक्षित शारीरिक अंतर राखणे, मास्क, सॅनिटायझेशनचे सगळे नियम धाब्यावर ठेवले गेले.

चौकट

रात्री उशीरापर्यंत रांगा लावून लाभ घेतला

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाला दिलासा देण्यासाठी मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलती आणि ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन चलान भरल्यानंतर पुढील चार महिने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तीन टक्के सवलतीचा लाभ याला चांगला प्रतिसाद मिळाला. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि वर्षाच्या शेवटच्या रात्री उशीरापर्यंत नागरिकांनी रांगा लावून दस्त नोंदणी केली. सुट्टीच्या दिवशी देखील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सुरू ठेवण्यात आली होती.”

- अनिल पारखे, मुद्रांक जिल्हाधिकारी

---------

जानेवारी ते डिसेंबर दरम्यान झालेली दस्त नोंदणी

महिना दस्त नोंदणी

जानेवारी २२,५५६

फे ब्रुवारी २०,२६९

मार्च १३,२४४

एप्रिल ०

मे १,०८०

जून ८,०६८

जुलै ९,५४३

ऑगस्ट १३,२८४

सप्टेंबर १८,०३२

ऑक्टोबर १९,२४८

नोव्हेंबर २२,०६१

डिसेंबर ३८,१५७

Web Title: Land transactions until midnight on Thirty First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.