अमेरिकेत राहणाऱ्या ज्येष्ठाची जमीन हडपली
By admin | Published: May 2, 2015 05:22 AM2015-05-02T05:22:50+5:302015-05-02T05:22:50+5:30
खोटी कागदपत्रे तयार करून, बनावट व्यक्ती उभ्या करून, खोटा दस्त करून अमरिकेत वास्तव्यास असलेल्या ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची जमीन हडपण्याचा
भोर : खोटी कागदपत्रे तयार करून, बनावट व्यक्ती उभ्या करून, खोटा दस्त करून अमरिकेत वास्तव्यास असलेल्या ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची जमीन हडपण्याचा प्रकार भोर तालुक्यातील कामथडी येथे उघडकीस आला आहे. भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
शदर विनायक ठकार असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोर पोलिसांकडून मिळालेली महिती अशी : शरद विनायक ठकार (वय ७४), त्यांची पत्नी कुंदा, मुलगा महेश व मुलगी मोनिका हे सध्या अमेरिकेत राहतात. त्यांची भोर तालुक्यातील कामथडी येथे वडिलोपार्जित मिळकत गट नं. ९४-१-ब ही ६४ आर जमीन आहे. ही जमीन १९४७पासून चंद्रकांत बाबूराव वाल्हेकर (रा. कामथडी) हे संरक्षित कूळ म्हणून असून ते कसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते अमेरिकेहून पुण्याला आल्यावर ती जमीन अरुणा चंद्रकांत वाल्हेकर यांना त्यांनी विकली.
त्याचा दस्त करण्यासाठी भोरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आले असता निबंधकांनी सांगितले की, ही जमिनीचे ९-२-२०१५ रोजी खरेदी खत झाले आहे.
या खरेदी खताचा दस्त काढला असता, शरद ठकार यांच्या कुटुंबीयांच्या नावाने बनावट व्यक्ती उभ्या करून अविनाश दिलीप चरवड, बजरंग दत्तात्रय चरवड (रा. वडगाव बु., ता. हवेली), बापू ज्ञानोबा पोळेकर (रा. कांजळे, ता. भोर), सगनगौडा धर्मगौडा नाईक (प्लॉट नं. ४३, सिद्धिविनायक अंगण, नऱ्हे, ता. हवेली) यांनी आपापसात संगनमत कट करून बनावट शरद विनायक ठकार, त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी उभे करून त्यांचे वारस आहेत, असे भासवून जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आह. भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)