जमीन असेल ५ स्टार, व्यवहार होतील निर्विघ्न; भूमि अभिलेखचा पुढाकार, वहिवाट नकाशाला जोडणार
By नितीन चौधरी | Published: June 9, 2023 08:30 AM2023-06-09T08:30:49+5:302023-06-09T08:31:22+5:30
त्यातूनच ही संकल्पना मांडण्यात आली आहे.
नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: तुमच्या नावावर असलेली जमीन पूर्णपणे तुमच्या वहिवाटीखाली आहे व जमिनीचे नकाशेही तंतोतंत जुळत आहेत, अशा जमिनी सरकारच्या लेखी ५ स्टार असतील. अर्थात या जमिनीच्या हद्दीविषयी कोणतेही वाद नाहीत आणि खरेदी-विक्रीत कोणतेही कायदेशीर विघ्न येणार नाही. भूमी अभिलेख विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी लवकरच पाठविण्यात येणार आहे. सध्या राज्यभर रोव्हरद्वारे जमीन मोजणीचे काम सुरू आहे. त्यात आता संकेतस्थळावर नकाशे जुळणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यातूनच ही संकल्पना मांडण्यात आली आहे.
१ जूनपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यात जमीन मोजणी आता रोव्हरद्वारे सुरू झाली आहे. तर, येत्या तीन महिन्यांत संपूर्ण राज्यात अशाच पद्धतीने जमीन मोजणी करण्यात येणार आहे. या मोजणीमुळे जमिनींच्या नकाशांना अक्षांश व रेखांश जोडले जात आहेत. हा नकाशा आता संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नकाशानुसार आपली जमीन वहिवाटीखाली आहे का, हे देखील बघणे सोपे झाले आहे.
अशी असेल स्टार सिस्टम
- जमिनीची मोजणी करताना प्रत्यक्ष नकाशा व वहिवाटीखाली असलेली जमीन याचीही नोंद केली जात आहे. त्यात ही तफावत आढळून येत असून, ती टक्क्यांमध्ये दाखविली जाणार आहे.
- शून्य ते पाच टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात कमी किंवा जास्त असल्यास त्याला ५ स्टार अर्थात सर्वात चांगली जमीन असे संबोधले जाणार आहे. तफावत पाच ते दहा टक्क्यांमध्ये असल्यास ४ स्टार रेटिंग व त्यानंतर सुमारे २५ टक्क्यांपर्यंतच्या तफावतीसाठी अनुक्रमे ३, २ व १ स्टार देण्यात येणार आहेत.
ऑगस्टअखेर ही प्रणाली राज्यात सुरू होईल. याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पंधरवड्यात पाठविण्यात येईल. जमीन व्यवहारांसाठी ही पद्धत सोयीची असेल. देशात प्रथमच अशी रेटिंग प्रणाली लागू होत आहे. - निरंजन सुधांशू, भूमि अभिलेख संचालक व जमाबंदी आयुक्त.