खोट्या माणसाने खोटी सही करत लाटली अडीच कोटींची जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:01+5:302021-08-18T04:15:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटी व्यक्ती उभा करून, खोट्या सह्या करीत जमीन परस्पर नावावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटी व्यक्ती उभा करून, खोट्या सह्या करीत जमीन परस्पर नावावर करून घेत तब्बल अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
उत्तुंग पाटील (वय २८, रा. राहटणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. मे २०२१ ते जून २०२१ या कालावधीत हिंजवडी फेज १ परिसरात हा प्रकार घडला.
आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांच्या नावावर मुळशी तालुक्यातील गोडांबेवाडी येथे असलेले शेताचे परस्पर बनावट व्यक्ती उभ्या करून, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून तसेच खोट्या सह्या करून साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले. तसेच खरेदीखत तयार करून परस्पर ही जमीन उत्तुंग याच्या नावावर करून फिर्यादीची २ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी उत्तुंग याला न्यायालयात हजर केले असता, गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला मदत करणारी टोळी ही आंतरराज्यीय असू शकते. यात कुणी शासकीय नोकर सहभागी आहे का, बनावट कागदपत्रे कोठे तयार करून घेतली, त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी, तसेच त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन नावावर करून ती इतर कोणाला विकली आहे का याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.