चित्रपटात भूदृश्यकला प्रेक्षकांवर उमटवते ठसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:12 AM2021-05-09T04:12:37+5:302021-05-09T04:12:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चित्रपटात भूदृश्यकला (लॅण्डस्केप) केवळ पार्श्वभूमी म्हणून वापरले जात नसून, ते त्यातील कथा, आशय, अभिव्यक्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चित्रपटात भूदृश्यकला (लॅण्डस्केप) केवळ पार्श्वभूमी म्हणून वापरले जात नसून, ते त्यातील कथा, आशय, अभिव्यक्ती म्हणून एक जिवंत पात्राची भूमिकाही करत असते. प्रेक्षकाच्या मनावर याचा अप्रत्यक्ष, पण खोल परिणाम होत असतो. चित्रपटात निवडलेली ठिकाणे, तेथील निसर्ग, त्यातील विविध आवाज हे मानवी पातळीवरील वास्तव मात्र चित्रपटातून प्रतीकात्मक पद्धतीने अभिव्यक्त होत असते, अशा शब्दात वास्तुरचनाकार असणाऱ्या चित्रपटमाध्यमांशी संबंधित तीन तरुण अभ्यासकांनी चित्रपटातील भूदृश्यकलेचे महत्त्व विशद केले. या चर्चेसाठी जगभरातील चार प्रसिद्ध चित्रपट निवडण्यात आले होते.
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) लॅण्डस्केप (भूदृश्यकला) विभागातर्फे ‘जागतिक लॅण्डस्केप वास्तूरचनाकार महिना’ नुकताच साजरा केला. त्यानिमित्ताने ’चित्रपटातील भूदृश्यकला’ हा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजिला होता. क्साय डिझाईन कन्सल्टंट्सचे संस्थापक, वास्तुरचनाकार आणि छायाचित्रणकार सचिन बोकिल, ब्रिक स्कूल ऑफ इंटिरियर डिझाईनचे विभागप्रमुख, वास्तुरचनाकार आणि कलावंत मयूरेश शिरोळकर, आणि दिल्लीच्या हजेलअर्थ स्टुडिओचे संस्थापक, भूशास्त्रकला वास्तुरचनाकार आणि रेखाचित्रकार नाईक सहभागी झाले होते.
नाईक यांनी चित्रपटातून निसर्गाचा म्हणजेच भूदृश्याचा एक मोठा पट समोर मांडला जातो. असे असले तरी निसर्ग हा एरव्ही न मोजता येणारा अमूर्त तसेच अवर्णनीय असतो. ते दृश्य त्या निसर्गाचे प्रातिनिधिक स्वरूप असते व प्रेक्षकांशी ते भावनिक नात्याने जोडले जात असल्याचे सांगितले.
सचिन बोकिल म्हणाले की, चित्रपटांमधील पूरक भूदृश्यातून त्यामागचा दृष्टिकोन समजावून घेताना त्यातून मानवी जीवनातील आनंदाचा एक तुकडाच समोर ठेवला जातो. यात कथेच्या गरजेनुसार नैसर्गिक किंवा भूदृश्य बाह्य परिस्थिती ठरवली जाते. त्यातून कथेचा भाव (मूड) अधिक समृद्ध केला जातो. तसेच कथेतील पात्रं आणि पार्श्वभूमी यांचा मेळ घालताना दुग्धशर्करा योग साधला जातो. तसेच प्रेक्षकांना त्यांच्या पंचेंद्रियांची संवेद्य अनुभूती देण्याचा प्रयत्न असतो. यातून चित्रपट हा प्रतीकात्मकतेकडून वास्तवतेकडे जातो. त्याचा उलट प्रवास होत नाही.
सौरभी नाईक यांनी महिला भूदृश्यकला वास्तुरचनाकार आणि चित्रपट यांचे जवळचे नाते आहे.पूर्वी पुरेशा अभिव्यक्त न होणाऱ्या स्त्रीला आता स्वत:तील संवेदनशीलता अधिक मुक्तपणे मांडता येईल, तसेच निसर्गातील विविध रुपांशी जोडले जाता येईल.