मानवाच्या हस्तक्षेपामुळे भूस्खलन

By Admin | Published: July 31, 2014 02:36 AM2014-07-31T02:36:32+5:302014-07-31T02:36:32+5:30

महाराष्ट्रातील डोंगर हे बेसॉल्ट खडकापासून तयार झाले असून संततधार पडणा-या पावसामुळे या खडकाची झीज होते. त्यामुळे डोंगराच्या उतारावर मातीचे थर जमा होतात

Landslide due to Human Intervention | मानवाच्या हस्तक्षेपामुळे भूस्खलन

मानवाच्या हस्तक्षेपामुळे भूस्खलन

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्रातील डोंगर हे बेसॉल्ट खडकापासून तयार झाले असून संततधार पडणा-या पावसामुळे या खडकाची झीज होते. त्यामुळे डोंगराच्या उतारावर मातीचे थर जमा होतात. परंतु, पावसाचे पाणी या मातीच्या थरांच्या वरून न वाहता त्यांच्या खालून झिरपून वाहते. त्यातच डोंगरपायथ्याचे खोदकाम केलेले असेल तर हे मातीचे थर अचानकपणे ढासळतात. आंबेगावमधील माळीण या गावाला लागून असलेल्या डोंगरावर अशाच प्रकारच्या मातीचे थर होते. जोरदार पावसामुळे हे मातीचे थर अचानकपणे ढासळल्याने दूर्दैवी घटना घडल्याची शक्यता पुणे विद्यापीठातील भूशास्त्र विभाग प्रमुखांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या घटनांचा व त्याला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा अभ्यास पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी केलेला आहे. भूशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. जे. सांगोडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. के. गायकवाड तसेच प्राध्यापक डॉ. डी. सी. मेश्राम म्हणाले, महाराष्ट्रातील डोंगर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी बेसॉल्ट या खडकापासून तयार झाले आहेत. या खडकाची वारंवार पडणा-या पावसामुळे झीज होते. या खडकामध्ये फेरोमॅग्नेशियम मिनरल हा घटक असतो. या घटकाची झीज होऊन स्मिकटाईट क्लेज म्हणजेच माती तयार होतात. या मातीचे थर डोंगर उतारावरील खडकांना चिटकलेले असतात. त्याच प्रमाणे स्मिकटाईट क्ले या मातीमध्ये अधिकाधिक पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. पावसाचे पाणी शोषून घेतल्यानंतर या मातीच्या थराचे वजन त्याच्या मुळ वजनाच्या दहापट वाढू शकते. त्यात पावसाचे पाणी या मातीच्या थरावरून वाहत नाही तर थराच्या खालून वाहते. परिणामी पाणी शोषून जड झालेल्या या मातीच्या थरांची ढासळण्याची प्रकिया सुरू होते. ब-याचदा हे थर अचानकपणे काही सेकंदांमध्ये ढासळतात. परिणामी या थरांच्या खाली येणारे सर्व काही गाडले जाते.
डॉ. सांगोडे म्हणाले, निसर्ग निर्मित डोंगराचे स्तर विकास कामांसाठी पोखरले जातात. डोंगराच्या पायथ्याजवळील स्थर पोखरले गेल्यास डोंगर उतारावर तयार झालेले मातीचे थर ढासळण्याच्या घटना अधिक घडतात. वर्षानुवर्षे डोंगरावर पडणा-या पावसामुळे खडकाची झीज होण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. परंतु, खडकाची झीज होऊन तयार झालेल्या मातीच्या थरांची ढासळण्याची प्रक्रिया डोगर उतारावर झाडे लावून थांबविता येऊ शकते. (प्रतिनिधी)

Web Title: Landslide due to Human Intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.