Malshej Ghat: दरड कोसळण्याच्या घटना वारंवार; पर्यटकांना बंदी, माळशेज घाटात शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:50 PM2023-07-26T12:50:36+5:302023-07-26T12:51:48+5:30

माळशेज भागातील आदिवासींच्या पावसाळी व्यवसायांवर गदा आली असून, उपासमारीची वेळ

Landslides occur frequently Tourists are banned in Malshej Ghat | Malshej Ghat: दरड कोसळण्याच्या घटना वारंवार; पर्यटकांना बंदी, माळशेज घाटात शुकशुकाट

Malshej Ghat: दरड कोसळण्याच्या घटना वारंवार; पर्यटकांना बंदी, माळशेज घाटात शुकशुकाट

googlenewsNext

उदापूर : नगर-कल्याण महामार्गावरील निसर्गरम्य माळशेज घाटात धुवाधार पाऊस रोज हजेरी लावत असल्यामुळे घाट हिरवळीने नटला आहे, तर धबधबे काही प्रमाणात चालू झाले आहेत. त्यामुळे घाटातील विलोभनीय दृश्य डोळ्यांत साठवून उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांखाली चिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक माळशेज घाटात हजारोंच्या संख्येने गर्दी करीत असतात. मात्र, ठाणे जिल्हाधिकारी यांनी यावर्षी मनाई आदेश लागू केल्याने पर्यटकांनी घाटाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे भागातील आदिवासींच्या पावसाळी व्यवसायांवर गदा आली असून, उपासमारीची वेळ आली आहे.

माळशेज घाटातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांचा कल हळूहळू वाढत होता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत होता. परंतु दमदार पावसाळ्यात माळशेज घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे व अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे माळशेज घाट अपघाती क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे.

पर्यटनस्थळी नशेबाज तरुणांचा धुडगूस ही चिंतेची बाब आहे. भरीस भर म्हणून धोकादायक क्षेत्रात नको ते स्टंट करणारे महाभाग पर्यटनाला गालबोट लावताना आढळत आहेत. शिवाय अपघातांना आपसूकच निमंत्रण मिळत असल्यामुळे यावर्षी अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, ठाणे जिल्हाधिकारी यांनी घाटात येणाऱ्या पर्यटकांना मनाई आदेश दिले आहेत. याचाच परिणामी, घाटात शुकशुकाट दिसून येत आहे. पर्यटकांनी यंदा माळशेज घाटाकडे पाठ फिरविल्याने येथील आदिवासी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासींचा पावसाळी रोजगार पूर्णपणे कोलमडला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे टोकावडे (जि. ठाणे) पोलिस स्टेशनच्या वतीने खडा पहारा देण्यात येत आहे. टोकावडे पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात १८ पोलिस कर्मचारी व दोन अधिकारी चोख बंदोबस्त बजावत आहेत. धोकादायकपणे पर्यटन करणाऱ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर आहे. घाट चढून आल्यावर ओतूर पोलिस स्टेशनची हद्द सुरू होते. ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी अप्रिय घटना टाळण्यासाठी डोळ्यांत तेल घालून खडा पहारा देत आहेत.

''माळशेज घाटात पर्यटकांना मनाई आदेशामुळे पर्यटक घाटात फिरकायला तयार नाही. याचा परिणाम आम्हा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर झाला असून, आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अत्यल्प भांडवलात सुरू केलेल्या व्यवसायातून सुमारे रोज ५०० रुपये मिळतात. आता घाटात पर्यटक फिरकत नसल्याने व्यवसायाला चालना मिळात नसल्याने आमचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. -विठ्ठल पारधी, जगन कोकणे. व्यावसायिक, माळशेज घाट.'' 

Web Title: Landslides occur frequently Tourists are banned in Malshej Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.