माणसांनुसार बदलते पोलिसांची भाषा
By admin | Published: July 28, 2014 04:56 AM2014-07-28T04:56:17+5:302014-07-28T04:56:17+5:30
पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे निरसन पोलिसांनी केलेच पाहिजे. त्यांना योग्य वागणूक दिलीच पाहिजे.
पिंपरी : ‘पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे निरसन पोलिसांनी केलेच पाहिजे. त्यांना योग्य वागणूक दिलीच पाहिजे. अरेरावी करणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही. अशा पोलिसांवर कठोर कारवाई करा,’ अशा शब्दांत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. या आदेशामुळं काही फरक पडणार आहे का? मुळात पोलीस ठाण्यात येणाऱ्या कुणाला कशी वागणूक दिली जाते, याचा धांडोळा घेतला असता, पोलीस बहुरंगी भूमिका वठवताना दिसतात. प्रत्येक प्रवेशात त्यांचे डायलॉगही बदलतात. कसे ते पाहा...
जोडगोळीचा ‘चोरीचा मामला’
महाविद्यालयीन युवक-युवतींना आक्षेपार्ह वर्तन करताना पकडल्यास त्यांना बोलायलाही तोंड नसते. अशा वेळी मुलीला खुर्चीवर बसविले जाते, तर मुलाला मात्र खाली जमिनीवर बसविले जाते. थोडी दमदाटी केल्यास मुलगी घडाघडा बोलू लागते. मोबाइल नंबरही मुली खरे देतात. मुले मात्र चुकीचे मोबाइल नंबर पोलिसांना देतात. काही वेळा मित्रांचा नंबर वडिलांचा नंबर म्हणून देतात. कधीही न ऐकलेल्या शिव्या मुलांना पोलीस ठाण्यात ऐकाव्या लागतात. मुलींना मात्र सभ्यतेची वागणूक दिली जाते. आपले प्रकरण घरी कळेल, या दबावाखाली मुलगा-मुलगी दोघेही असतात. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांना बोलावले जाते. समज देऊन सोडून दिले जाते. मात्र, दरम्यानच्या काळात विशेषत: मुलाला खूपच त्रास होतो. त्याला अशा ठिकाणी बसविले जाते, जिथून तो जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाला दिसू शकतो. पुढे अनेक दिवस त्याला नजर चुकवत फिरावे लागते.