सुरक्षा कीट मागणाऱ्या परिचारिकेला धमकी देण्याची डॉक्टरांची भाषा अत्यंत चुकीची, मात्र भावना योग्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 09:29 PM2020-05-08T21:29:33+5:302020-05-08T21:33:31+5:30
गणेश पेठेतील एका खासगी डॉक्टरांकडून परिचारिकेला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुणे : सुरक्षा कीट मागणाऱ्या परिचारिकेला अर्वाच्य भाषेत बोलून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या डॉक्टरांची भाषा अत्यंत चुकीची असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, डॉक्टरांनी व्यक्त केलेली भावना मात्र योग्य आहे. कारण सध्या डॉक्टरांना दवाखाना चालविण्यासाठी परिचारिका, इतर कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. दवाखाना बंद ठेवला तर शासन कारवाईची टांगती तलवार आहे, असेही त्यांनी नमुद केले.
गणेश पेठेतील एका खासगी डॉक्टरांकडून परिचारिकेला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये परिचारिकेकडून सुरक्षा कीटची मागणी केली जात आहे. तसेच आई-वडिलांना आपल्या सुरक्षेची लेखी हमी हवी असल्याचेही ती सांगत आहे. यावर डॉक्टरांकडून अर्वाच्य भाषा वापरून नोकरीवरून काढण्याची तसेच खोली खाली करण्याची धमकी दिली जात असल्याचे दिसते. याविषयी बोलताना डॉ. भोंडवे म्हणाले, संबंधित डॉक्टरांनी वापरलेली भाषा अत्यंत चुकीची आहे. अशा पध्दतीने डॉक्टरांनी परिचारिका किंवा कर्मचाऱ्यांशी बोलू नये. पण या डॉक्टरांची भावनाही समजून घ्यायला हवी. सध्याच्या स्थितीत रुग्णालय सुरू ठेवून रुग्णसेवा करण्याची त्यांची तयारी आहे. परिचारिका तसेच अन्य कर्मचारी नसल्याने काही नर्सिंग होम, क्लिनिक बंद ठेवावी लागली आहेत. सुरूवातीला त्यांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत होत्या. कर्मचाऱ्यांच्या घरातील लोकांकडूनच त्यांना अडविले जात आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याची समजूत त्यांच्या मनात आहे. या भीतीतूनच अनेक कर्मचारी येत नाहीत. परिचारिकांना तर अशा परिस्थितीत कशी काळजी घ्यावी, याची माहिती असते.
परिचारिका व कर्मचारी नसल्याने डॉक्टर अडचणीत आले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना आधीच सांगितले आहे. पण डॉक्टरांना दवाखाने उघडे ठेवणे भाग आहे. अन्यथा नोंदणी रद्द होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे कर्मचारी मिळत नाहीत. शहरात १५ मार्चपासूनच हीच स्थिती आहे. त्यामुळे दवाखाने चालविणेही कठीण होत आहे, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.
----------------------------