कुठलिही भाषा हे माध्यम आहे आशय नाही : नागराज मंजुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 09:37 PM2020-02-27T21:37:13+5:302020-02-27T21:40:20+5:30
मराठी भाषा दिनानिमित्त आयाेजित नागराज मंजुळे यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
पुणे : कुळलिही भाषा हे संवादाचे माध्यम आहे, ताे आशय नाही. त्यामुळे एखाद्याची भाषा कशी आहे हे पाहण्यापेक्षा ताे काय बाेलताेय , त्याचा आशय काय आहे हे पाहायला हवे असे मत लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
मराठी दिनानिमित्त जागतिक मराठी अकादमीतर्फे नागराज मंजुळे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयाेजन आज बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. वात्रटीकाकार रामदास फुटाणे आणि निर्माते, दिग्दर्शक विवेक वाघ यांनी मंजुळे यांची मुलाखत घेतली. विविध विषयांवर मंजुळे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या तसेच सैराटचा आपला प्रवासही उलगडून सांगितला.
मंजुळे म्हणाले, समाेरचा कुठल्या भाषेत बाेलताेय हे महत्त्वाचे नाही, ताे काय बाेलताेय हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्ञान हे भाषेपेक्षा वेगळे असते. अनेकदा मराठी माणूस जर एकमेकांसाेबत इंग्रजीमध्ये बाेलत असेल तर समाेरचा काय बाेलताेय हे पाहण्यापेक्षा ताे बराेबर इंग्रजी बाेलताेय का याकडे अधिक लक्ष दिले जाते. समाेरच्याचा आशय समजून घ्यायचा प्रयत्न केल्यास भाषेची अडचण येत नाही. आपल्या चित्रपटांमधील पात्रांच्या भाषेबाबत बाेलताना ते म्हणाले, मला माझी भाषा बाेलणारी पात्र सिनेमांमध्ये हवी हाेती. त्यामुळे माझ्या सिनेमांमधील पात्रे तशी भाषा बाेलतात. पुण्यात शिक्षणासाठी आलाे तेव्हा मला माझ्या भाषेचा न्यूनगंड हाेता. विद्यापीठात असताना इंग्रजीची भीती वाटत असे.
झुंडच्या निमित्ताने अभिताभ बच्चन यांच्यासाेबतचा अनुभव कथन करताना ते म्हणाले, अभिताभ यांना भेटायला गेलाे तेव्हा आमची अर्ध्या तासाची भेट ठरली हाेती, परंतु तासापेक्षा जास्तवेळ आम्ही गप्पा मारल्या. त्यांच्यासाेबत जर इंग्रजी बाेलायची वेळ आली तर आम्ही आमच्या एका सहकाऱ्याला साेबत घेतले हाेते परंतु तशी वेळ आली नाही. सेटवर देखील अभिताभ आमच्यासाेबत मिसळून गेले हाेते.