खोडद परिसरात तोई पोपटांचे मोठ्या संख्येने वास्तव्य, जीएमआरटी प्रकल्पातील जंगलांचा पर्यावरणासाठी फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:13 AM2021-09-16T04:13:55+5:302021-09-16T04:13:55+5:30

भारतात पोपटांच्या सुमारे बारा जाती आढळतात. त्यातला पोपट किंवा पहाडी पोपट आपल्याकडे जास्त प्रमाणात पाळला जातो. या पोपटाचाच एक ...

Large number of toi parrots live in Khodad area, forests in GMRT project benefit the environment | खोडद परिसरात तोई पोपटांचे मोठ्या संख्येने वास्तव्य, जीएमआरटी प्रकल्पातील जंगलांचा पर्यावरणासाठी फायदा

खोडद परिसरात तोई पोपटांचे मोठ्या संख्येने वास्तव्य, जीएमआरटी प्रकल्पातील जंगलांचा पर्यावरणासाठी फायदा

Next

भारतात पोपटांच्या सुमारे बारा जाती आढळतात. त्यातला पोपट किंवा पहाडी पोपट आपल्याकडे जास्त प्रमाणात पाळला जातो. या पोपटाचाच एक भाऊ म्हणजे तोईपोपट किंवा पंचरंगी पोपट म्हणजेच लाल डोक्याचा पोपट होय. खोडद येथील जीएमआरटी प्रकल्प आणि नारायणगडाच्या परिसरात असलेल्या विपुल वनराजीत या पोपटांचं वास्तव्य आहे. सकाळी आणि सायंकाळी या पोपटांचे थवे वेगाने जाताना दिसतात. हे कधी उंच झाडांच्या शेंड्यावर येऊन विसावतात, तर कधी तारेच्या कुंपणावर स्थिरावतात.

तोईपोपट शक्यतो दाट जंगलांत किंवा कोरड्या परंतु विपुल प्रमाणात झाडी असणाऱ्या प्रदेशाला प्राधान्य देतात. खोडद परिसरात मोठ्या प्रमाणात उंच झाडे आहेत. यातल्या वाळलेल्या वृक्षांच्या खोडांवर ढोलीत त्यांची घरटी आहेत. या नैसर्गिक अधिवासामुळे या पक्ष्यांसाठी हे एक सुरक्षित स्थान उपलब्ध झालं आहे.

हे पोपट साधारणपणे ३०-३५ सेंमी लांबीचे असतात. यापैकी अर्ध्याहून अधिक भाग शेपटीचा असतो. या लांब शेपटीमुळे वेगाने उडणे, दिशा बदलणे, हवेत स्वतःभोवती गोल फिरणे अशा विविध कसरती हे पोपट अगदी सहज करतात. यांचा उडण्याचा वेगसुद्धा प्रचंड आहे. नराच्या डोक्याचा रंग लाल आणि त्याला हलकीशी निळसर छटा असते.खांद्यावर दोन्ही बाजूला एक छोटा लाल ठिपका असतो आणि गळ्याभोवती काळ्या रंगाची मफलर गुंडाळावी तशी रेषा दिसते. हा काळा रंग गळ्यापासून चोचीपर्यंत भिडलेला दिसतो. मादीच्या डोक्याचा रंग करडा आणि त्यात काहीशी जांभळी किंवा निळसर छटा दिसते.मादीला गळ्याभोवती कुठलीही रेषा आढळत नाही हाच या दोघांमधील फरक आहे.

हे पक्षी समूहाने राहणं पसंत करतात त्यामुळे अगदी दोन ते दहा वीस पक्षी एकत्र दिसू शकतात.माळावरील गवतांवर सप्टेंबरनंतर यांचे थवे गवतावर ताव मारताना दिसतात. डिसेंबर ते मार्च हा तोईपोपटांचा विणीचा हंगाम असतो. मादी साधारणपणे चार ते पाच छोटी सफेद अंडी घालते.अंडी उबवण्यापासून ते पिलांचं भरण पोषण सगळं ती एकहाती सांभाळते.

"खोडद परिसरात आढळणारे हे लाल डोक्याचे पोपट म्हणजे समृद्ध पर्यावरणाचे लक्षण आहे. या पोपटांचं अस्तित्व जंगलांच्या टिकून राहण्यावर अवलंबून आहे. हे पक्षी इथले प्रदेशनिष्ठ आहेत, त्यामुळे आपली जंगलं राखणं खूप महत्वाचं आहे. गवताळ कुरणं तसेच जंगल जपलं तरच या सुंदर पक्ष्यांचं वास्तव्य आपल्या आजूबाजूला टिकून राहील.पोपटांच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे."

- राजकुमार डोंगरे

वनस्पती व निसर्ग अभ्यासक, खोडद, ता. जुन्नर

150921\20210911_211630.jpg

कॅप्शन - खोडद परिसरातील जंगलांमध्ये मोठ्या संख्येने आढळणारा तोईपोपट म्हणजेच लाल डोक्याचा पोपट.खोडद येथील छायाचित्रकार विशाल गायकवाड यांनी टिपलेला हा फोटो.

Web Title: Large number of toi parrots live in Khodad area, forests in GMRT project benefit the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.