मेखळी-बारामती रस्त्यावर जांभळी फाटा येथे मधोमध मोठा खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:17+5:302021-07-11T04:08:17+5:30
वाहनधारकांना रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे रोज अपघात होत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी देखील ‘लोकमत’ने ...
वाहनधारकांना रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे रोज अपघात होत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी देखील ‘लोकमत’ने या भगदाड संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात हे भगदाड बुजवून प्रवाशांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोन माहिन्यांमध्येच हे भगदाड ‘जैसे थे’ झाले. भगदाड पडून चार महिने उलटून गेले, तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे हे भगदाड दिसत नाही. आणखी मोठे अपघात झाल्यावर संबंधित विभाग याकडे लक्ष देणार आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. मेखळी-बारामती हा रस्ता कमी पल्ल्याचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, परंतु संबंधित विभागाला याचे काही देणे-घेणे नसून प्रवास करणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर, वाहनधारकांना अपघाताचा सामना कराव लागत असल्याने वाहनधारक व परिसरातील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डा लवकरात लवकर कायमचा भरून काढावा, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून होत आहे.
————————————————
फोटो ओळी : मेखळी-बारामती रस्त्यावर भगदाड पडल्याने वारंवार घडतात अपघात होत आहेत.
१००७२०२१-बारामती-०८
———————————————