मोठे रॅकेट उघड होणार
By admin | Published: January 1, 2017 04:31 AM2017-01-01T04:31:53+5:302017-01-01T04:31:53+5:30
सर्पविष तस्करीप्रकरणी सांगली येथील बायोलॉजिकल कंपनीच्या संचालकास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींना ४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
चाकण : सर्पविष तस्करीप्रकरणी सांगली येथील बायोलॉजिकल कंपनीच्या संचालकास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींना ४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी एक उत्तराखंड, एक उत्तर प्रदेशातील व साप पुरविणारे सांगलीतील तीन सर्पमित्रांची नावे आरोपींकडून निष्पन्न झाली असून, आरोपींची संख्या आठ झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिसांनी आयसेरा बायोलॉजिकल प्रा. लि. या विष घेणाऱ्या कंपनीचा संचालक डॉ. नंदकुमार कदम यास सांगली येथून अटक केली. त्यामुळे सर्पविषाची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघड होणार आहे. चाकण पोलीस, वनविभाग यांच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी रणजित पंढरीनाथ खारगे (वय ३७, रा. ए १/४०६, सारासिटी, खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) व धनाजी अभिमान बेळकुटे (वय ३०, मूळगाव वरकुटे मूर्ती, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दोन आरोपींना अटक करून, त्यांच्याकडून ४० घोणस, ३१ कोब्रा नाग व विषाच्या तीन बाटल्या आदी साहित्य जप्त करण्यात आले होते.
आरोपींकडून सांगलीच्या एका कंपनीच्या संचालक डॉक्टरचे नाव निष्पन्न झाले. या डॉक्टरची स्वत:ची कंपनी असून, आरोपी खारगे याने कदमला ८ हजार रुपये प्रतिग्रॅमने २५ ग्रॅम विष विकून त्यास २ लाख रुपये मिळाले होते. या डॉक्टरने हे विष उत्तराखंड व उत्तर प्रदेश येथील कंपन्यांना विकले होते.
खारगे कोब्रा व घोणस पुरविणारे तीन सर्पमित्र सांगली येथील असून ते अद्याप फरार आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)