महाराष्ट्रातले सर्वात मोठे शहर आता पुणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:26+5:302021-07-01T04:09:26+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यासंदर्भातली अधिसूचना अखेरीस राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने बुधवारी (दि. ३०) काढली. ...
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यासंदर्भातली अधिसूचना अखेरीस राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने बुधवारी (दि. ३०) काढली. त्यामुळे सर्वाधिक क्षेत्रफळाचे शहर म्हणून पुण्याने मुंबईलाही मागे टाकले असून, पुणे हे आता राज्यातील सर्वात मोठे शहर बनले आहे. मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ चौरस किलोमीटर असून, पुण्याचे क्षेत्रफळ तब्बल ५१८.१६ चौरस किलोमीटर झाले आहे. नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीची समीकरणे कितपत बदलणार याची आता उत्सुकता असेल.
पुणे महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना ३४ गावे पालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला होता. तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला. २०१४ साली राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर गावे समाविष्ट करून घेण्यास उशीर लागत असल्यामुळे ग्रामस्थ न्यायालयात गेले होते. त्यानंतर २०१७ साली ११ गावांचा समावेश करण्यात आला. २०२० सालापर्यंत ३४ गावे समाविष्ट करून घेण्याबाबत राज्य सरकारने न्यायालयात शपथपत्र दिले होते. राज्य शासनाने अखेर ही अधिसूचना काढली.
या गावांच्या समावेशानंतर येथील पायाभूत सुविधांवर पालिकेला काम करावे लागणार आहे. पाणी, मलनि:सारण, शिक्षण आदी सुविधा उभारताना त्यासाठी मोठी आर्थिक तरतूदही करावी लागणार आहे. या गावांमधील अंदाजे लोकसंख्या चार लाखांच्या आसपास आहे. यातील बहुतांश गावांचे क्षेत्र पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत असल्याने गावांचा विकास आराखडा तयार झालेला आहे. या आराखड्याला अद्याप राज्य शासनाची मान्यता मिळालेली नाही. आता या गावांचा नवीन स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाणार की ‘पीएमआरडीए’चाच आराखडा लागू होणार याबाबत अस्पष्टता आहे.
चौकट
पालिकेच्या २०२२ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या दृष्टीने गावांच्या समावेशाकडे पाहिले जात आहे. पालिकेच्या हद्दवाढीमुळे नवीन प्रभाग रचना करावी लागणार आहे. या गावांमध्ये ‘राष्ट्रवादी’चे राजकीय वर्चस्व असल्याचे सांगितले जाते.
चौकट
नवीन गावे समाविष्ट करण्याआधी येथील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी तब्बल नऊ हजार कोटींची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. राज्य शासनाने ११ गावांच्या समावेशावेळी निधी दिलेला नव्हता. आताही २३ गावांच्या समावेश करताना निधी दिलेला नाही.
चौकट
ही गावे आली पुण्यात
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळवाडी, नांदोशी, सणसनगर, मांडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली