लेझर लाईटमुळे दृष्टी झाली अधू, दिसण्याचे प्रमाण ७० टक्क्याने कमी!
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: October 3, 2023 06:41 PM2023-10-03T18:41:28+5:302023-10-03T18:43:21+5:30
गणेश उत्सवात डाेळयाची दृष्टी झाली अधु...
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या लेझर लाईटमुळे जनता वसाहत येथे राहणाऱ्या तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याच्या एका डोळ्याची दृष्टी ६०- ७० टक्के कमी झाल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गणेश उत्सव उत्साहात पार पडला आणि आपल्या लाडक्या बाप्पाला सगळ्यांनी भक्तिभावाने निरोप दिला. परंतु या विसर्जन मिरवणुकीत यंदा खूप मोठ्या प्रमाणत डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर करण्यात आला. मात्र, त्यातील लेजर लाईटमुळे अनेकांची दृष्टीदेखील गेली.
अनिकेत (वय २३) असे या तरुणाचे नाव असून तो विसर्जनाच्या दिवशी पर्वती पायथा येथील मिरवणुकीत सहभागी झाला होता. नाचताना त्याचा एका नेत्रपटलावर या लेझर लाईटचा प्रकाश पडला. यावेळी दृष्टी मात्र अंधुक झाली. आता त्याला ड्राॅप दिले आहेत. त्याने कमी झाले नाही तर मग शस्त्रक्रिया करून त्याची दृष्टी काही प्रमाणात येऊ शकते, परंतु, पूर्णपणे पूर्वीसारखा बरा हाेऊ शकत नाही असे डॉ. दुधभाते यांनी स्पष्ट केले.
काय आहे लेझर बर्न?
लेझर लाईट ५ मिलीवॅटपेक्षा जास्त असल्यास आणि हा लाईट १० सेकंद जरी डोळ्यांवर पडला तर रेटीनाला इजा होण्याची शक्यता असते. जे युवक त्या लेझर फ्रिक्वेन्सीच्या 'फोकल लेंथ' वर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले त्यांना असे या त्रासाला सामोरे जावे लागते.
लेझर लाईटचे दुष्परिणाम
- डोळ्यातून पाणी येणे.
- दृष्टी अस्पष्ट होणे.
- डोळ्यांत सूज येणे.
- डोळ्यांसमोर अंधारी येणे.
- डोळे कोरडे पडणे.
अनिकेतसारखे अनेक रुग्ण असतील तर त्यांनी तातडीने नेत्ररोग तज्ञाला दाखवावे.या सगळ्या तरुणांना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या शिक्षणावर आणि करीअर साठी किती भयावह असेल याची कल्पना करवत नाही. त्यासाठी हा लेझर लाईट टाळावा. या लेझर वापरावर नियम , निर्बंध आणण्याची गरज आहे. नाही तर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीतही दिसतील.
- डॉ. अनिल दुधभाते, नेत्रराेग तज्ज्ञ, डाॅ. दुधभाते नेत्राल