सौंदर्यासाठी लेझर उपचाराकडे मध्यमवर्गीय तरूणींचा कल; मात्र ‘या’चाही होतोय धोकादायक वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:34 PM2017-12-06T15:34:36+5:302017-12-06T15:40:00+5:30
त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन लेझर उपचार करून घेण्याकडे आता मध्यमवर्गीय तरूणींचाही कल वाढला असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.
नम्रता फडणीस
पुणे : ‘सुंदर’ दिसावं असं वाटणं, यात चूक काहीच नाही, ही खूपच नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु हल्लीचा काळ हा सुंदर दिसण्यापेक्षाही ‘प्रेझेंटेबल’ दिसण्याचा अधिक आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणासह हार्मोन्सचे असंतुलन आणि ‘पोलिस्टीक ओव्हरीज’च्या वाढत्या समस्येमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या पिटिका, अनावश्यक केस, चेहरा काळवंडणे या गोष्टी तरूणींसाठी चिंतेचा विषय ठरू लागल्या आहेत. त्यामुळेच त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन लेझर उपचार करून घेण्याकडे आता मध्यमवर्गीय तरूणींचाही कल वाढला असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.
यातच आजही गोर असणं म्हणजेच सुंदरता, हीच सौंदर्याची परिभाषा वाटत असल्याने गोरेपणासाठीही क्रीम आणि स्टिरॉईडची इंजेक्शन घेण्यावर तरूणींकडून भर दिला जात आहे, परंतु त्याच्या दुष्परिणामांची माहिती नसल्याने तज्ज्ञांनी तरूणींना धोक्याचा इशारा दिला आहे.
एक काळ असा होता सुंदरता ही पाहणाऱ्याच्या नजरेत दिसत होती.. लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतरही तिचे नाकच ठुसके, तिचे ओठच ओबडधोबड, ती काय तर काळीच आहे अशा शब्द वल्गना होत नव्हत्या. तिला किंंवा त्याला आहे त्या रूपात स्वीकारणे आणि तनाच्या सुंदरतेपेक्षा मनाच्या सुंदरतेतून जोडीदाराची निवड करणे असा तो काहीसा मामला होता. मात्र काळानुरूप वृत्तवाहिन्यांचा पसारा वाढत गेला आणि जाहिराती-मालिकांमधून महिलांची ‘आकर्षक’अशी प्रतिमा समाजात तयार केली गेली. दुर्दैवाने तरूणींच्या हृदयावरही सुंदरतेची हीच परिभाषा घट्टपणे कोरली गेली. आज याच आकर्षकतेच्या मृगजळामागे तरूणी धावत सुटल्या आहेत. माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींनी जसे कॉस्मेटिक सर्जरीमधून आपले सौंदर्य खुलवले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत नाक, ओठ, चेहरा यांची कॉस्मेटिक सर्जरी करण्याकडे तरूणींचा कल वाढला आहे. यातच अनेक तरूणी किंवा महिला गोरे दिसण्यासाठी काही मलम आणि स्टेरॉईडचा वापर करताना दिसत आहेत, जे आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. मात्र तरूणी आणि महिलांमध्ये याबाबत जागृतीचा अभाव आहे. तरी याचा वापर करणा-या तरूणींनी गोरेपणासाठी कोणत्याही मलमांचा वापर करू नये किंवा उपचार घेऊ नये अन्यथा त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा त्वचा रोग तज्ज्ञांनी दिला आहे.
आपल्या सौंदयाबाबत आता तरूणी आणि महिला खूपच जागरूक झाल्या आहेत.सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरूणींमध्ये हार्मोन्सचे असंतुलन, लठ्ठपणा तसेच पोलिस्टिक ओव्हरीच्या वाढत्या समस्येंंमुळे सौंदर्यात बाधा ठरणाऱ्या अनेक तक्रारींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यासाठी मध्यमवर्गीय तरूणींबरोबरच मॅनोपॉज आलेल्या महिलांचे चेहरा, केस यांच्यावर लेझर उपचार करून घेण्याचे प्रमाण जवळपास ५० ते ६० टक्के इतके आहे. मात्र तरूणींनी चेहऱ्याशी निगडित कोणत्याही अवयवांवर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करून घेणे आवश्यक आहे. तरच ते आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरणारे आहे.
-डॉ. धनश्री भिडे, त्वचारोग तज्ज्ञ
गेल्या दोन वर्षांमध्ये सुंदरतेपेक्षाही ‘प्रेझेंटेबल’ दिसण्याकडे मुलींचा कल वाढत चालला आहे. अगदी थ्रेड लिफ्ट, फेसलिफ्ट, नोज रिशेपिंग, लिप्स रिडकशन असे उपचार करून घेण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये विशेषत; नॉन सर्जरी फिलर थ्रेडलिफ्टला जास्त मागणी आहे. या उपचारपद्धती सर्जिकल आणि नॉन सर्जिकल अशा दोन प्रकारामध्ये केल्या जातात.
- डॉ. भूषण पाटील, एमसी-एच कॉस्मेटिक सर्जन