‘लष्कर’चा अतिरेकी जुनैद मोहम्मद पुण्यात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 08:19 AM2022-05-25T08:19:38+5:302022-05-25T08:20:42+5:30
जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (वय २८) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एटीएसला यासंबंधी ३० डिसेंबर २०२१ रोजी गुप्त माहिती मिळाली होती.
पुणे : राज्यात घातपाती कृत्य घडवून आणण्यासाठी पुण्यातील तरुणाला लष्कर-ए-तय्यबा (एलईटी) या संघटनेत भरती केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)ने उघडकीला आणले. याला दापोडी परिसरातून अटक केली आहे.
जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (वय २८) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एटीएसला यासंबंधी ३० डिसेंबर २०२१ रोजी गुप्त माहिती मिळाली होती. चौकशीनंतर प्रकार समोर येताच मुंबईतील एटीएसच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून याला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर आहे. जुनैद हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील असून, दीड वर्षापासून पुण्यात राहत आहे. त्याच्या तीन साथीदारांचा एटीएस शोध घेत आहे. हे तिघेही मूळचे जम्मू-काश्मीर येथील राहणारे असून, ते लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित आहेत. जुनैदच्या साथीदाराने २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान अन्सर गझवात हिंद/तवाहिद नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. ग्रुपच्या माध्यमातून देशविरोधी व दहशतवादासंबंधी पोस्ट टाकत असे. याच ग्रुपमध्ये जुनैद सहभागी असल्याचे तपासात आढळले. जुनैद वेगवेगळ्या मोबाइल कंपनींचे १० सीमकार्ड वापरल्याने निष्पन्न झाले. फेसबुकवर ५ अकाउंट्स तयार करून ‘लष्कर-ए-तय्यबा’मध्ये भरतीसाठी प्रोत्साहित करीत
होता.