लासुर्णे परिसर ‘डेंगी’ तापाने फणफणला, ३००च्या वर रुग्ण; तालुका, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:07 AM2017-10-26T01:07:32+5:302017-10-26T01:07:44+5:30
लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरात डेंगी व विषाणुजन्य अजाराचा उद्रेक झाला आहे. दररोज नवीन रुग्ण भरती होत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याचे चित्र आहे.
लासुर्णे : लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरात डेंगी व विषाणुजन्य अजाराचा उद्रेक झाला आहे. दररोज नवीन रुग्ण भरती होत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याचे चित्र आहे. मात्र, प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीने एकदा धूरफवारणी केली असली, तरी आजराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. फक्त लासुर्णे गावामध्येच ३००च्या आसपास संशयित रुग्ण असल्याचे या वेळी अढळले.
इंदापूरच्या पश्चिम भागात डेंगीच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या भागातील खासगी दवाखान्यात रुग्ण अॅडमिट करून घेण्यास जागा उपलब्ध नसल्याने ओपीडी रूम, एक्स-रे रूम अशा ठिकाणी रुग्ण अॅडमिट असल्याचे चित्र दिसत आहे. लासुर्णे येथील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्या भागात शंभर ते दोनशे रुग्ण विषाणुजन्य आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले.
यावर्षी पाऊस जास्त झाल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली आहेत. या डबक्यात विषाणुजन्य आजारांच्या डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत आहे. या भागात डेंगी, चिकुनगुनिया, गोचिडताप यासारख्या आजाराने रुग्ण त्रस्त आहेत. इंदापूरच्या पश्चिम भागातील जंक्शन, लासुर्णे, बेलवाडी, परिटवाडी आदी भागातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
या भागातील खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या एवढी दिसून येत आहे की, दवाखान्यात कॉट शिल्लक नसल्याने चित्र
सध्या पाहावयास मिळत आहे. प्रशासन मात्र याबाबत जबाबदारी झटकताना दिसत आहे.
तालुक्यामध्ये दिवसेंदिवस आजारांचा उद्रेक सुरू असतानाही त्यावर उपाययोजना केल्याचे
दिसून येत नाही.
आजाराच्या उद्रेक काळातच लासुर्णे ग्रामपंचायतीच्या फॉगिंग मशीन नादुरुस्त आहेत. रोगराईच्या काळातच मशीन नादुरुस्त झाल्याने काही दिवसांपूर्वी भाडोत्री मशीन आणून फवारणी करण्याची नामुष्की लासुर्णे ग्रामपंचायतीवर आली होती. अद्यापही या मशीन नादुरुस्तच आहेत. एकदा फवारणी करूनदेखील डासांचा उपद्रव आवाक्यात आला नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी देखील आपली उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहेत. याबाबत लासुर्णे गावच्या सरपंच निर्मला चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्या ग्रामपंचायतमधील फॉगिंग मशीन नादुरुस्त असल्याने आपण बाहेरून भाडोत्री मशीन मागवून सहा प्रभागात फॉगिंग मशीनने फवारणी केली आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाºयांना याबाबत सूचना दिल्या आहेत. ज्या भागात असे संशयित रुग्ण असतील त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व्हे करावा, तसेच घरोघरी जाऊन डेंगीबाबत जनजागृती करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- प्रवीण माने, जिल्हा आरोग्य व बांधकाम सभापती