गेल्या ९ वर्षांपासून अंगणवाडी भरते उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 05:04 AM2017-07-20T05:04:27+5:302017-07-20T05:04:27+5:30

नगरपालिकेच्या हद्दीत येऊनदेखील प्रगतीनगर-मोरयानगर भागातील अंगणवाडीला हक्काची इमारत मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील ९ वर्षांपासून रस्त्यावरच

For the last 9 years, the anganwadi fills open | गेल्या ९ वर्षांपासून अंगणवाडी भरते उघड्यावर

गेल्या ९ वर्षांपासून अंगणवाडी भरते उघड्यावर

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : नगरपालिकेच्या हद्दीत येऊनदेखील प्रगतीनगर-मोरयानगर भागातील अंगणवाडीला हक्काची इमारत मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील ९ वर्षांपासून रस्त्यावरच भर चिमुकल्यांची अंगणवाडी रस्त्यालगतच्या झाडाखाली भरवली जाते. अनेकदा प्रस्ताव देऊन इमारत बांधली जात नाही. विकासाचा दावा करणाऱ्या बारामतीमध्ये चिमकुल्यांना हक्काची अंगणवाडी इमारत मिळत नाही, हेच दुर्दैव आहे.
मुले कुपोषित राहू नयेत, त्यांना सकस आहार मिळावा, त्याचबरोबर शिक्षणाची गोडी लहानपणापासून लागावी, यासाठी अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्यात आले. नगरपालिकेच्या हद्दीत येण्यापूर्वी प्रगतीनगर- मोरयानगर परिसरात ‘ओपनस्पेस’ अंगणवाडी भरवण्यास सुरुवात झाली. तब्बल नऊ वर्षांनंतरदेखील चिमुकल्यांना अंगणवाडीच्या इमारतीपासून वंचित राहावे लागले आहे. अंगणवाडीचे नाव प्रगतीनगर आहे आणि भरवली जाते मोरयानगरच्या हद्दीत. मुले, मुली त्याच परिसरातील, तरीदेखील जागेचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस, थंडीच्या काळातदेखील विद्यार्थ्यांना उघड्यावरच झाडाखाली शिक्षण घ्यावे लागत आहे.
सध्या पावसाचे दिवस आहेत. अंगणवाडी भरल्यावर अचानक आलेल्या पावसापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची धावपळ होते. निवारा नसल्याने मुलांना पावसाळ्यात आहार देऊन सोडावे लागते. याप्रश्नी अनेकदा प्रस्ताव दिला, मात्र माशी कुठे शिंकते याचा थांगपत्ता नाही. त्याचा त्रास मात्र मुलांना आणि कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. सध्या २० ते २५ मुले या अंगणवाडीत येतात. त्यांना तळवट टाकून बसवले जाते. यासह अन्य अडचणीदेखील आहेत.
अंगणवाडीची खोली बांधून मिळाल्यास पट वाढेल, अशी स्थिती आहे. एकीकडे शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाचा प्रसार केला जात आहे. मुलांना लहानपणापासूनच शाळेची गोडी लागावी, त्यांचे कुपोषण होऊ नये, यासाठी अंगणवाड्या ठिकठिकाणी सुरू केल्या आहेत. ज्यांना भरमसाठ शुल्क भरून नर्सरीच्या वर्गात जाता येत नाही, त्यांना अंगणवाडीचा पर्याय चांगला आहे; मात्र, विकासाचे गोडवे सातत्याने गात जात असताना शहरातील अंगणवाडीच्या मुलांना हक्काचा निवारा मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

या संदर्भात या अंगणवाडीच्या सेविका सविता रायसुरे यांनी सांगितले की, अंगणवाडीच्या खोलीसाठी प्रस्ताव दिला आहे. खोली बांधकामाबाबत पंचायत समिती पातळीवर निर्णय होईल़
मात्र मागील ९ वर्षांपासून अंगणवाडीला हक्काची खोली नाही. त्यामुळे कोणताही पर्याय नाही. पंचायत समितीच्या यापूर्वीच्या एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना याबाबत पुन्हा माहिती देण्यात येईल.

Web Title: For the last 9 years, the anganwadi fills open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.