अखेर वीस वर्षांनी मिटला शेतकरी बांधवांमधील वाद, बारामती पोलिसांच्या प्रयत्नांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 02:26 PM2021-05-07T14:26:00+5:302021-05-07T14:32:31+5:30
तीन भावांमध्ये निर्माण झाला होता शेतीच्या बांधाचा वाद
बारामती (सांगवी): शेतीच्या बांधावरून भावकी गावकीत वाद होऊन हाणामारीतून अनेक खून झालेल्या घटना समोर येत असतात, यातच पोलीस स्टेशन,कोर्टाच्या पायऱ्या चढून त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. मात्र, अशा वेळी योग्य सल्लागार व समुपदेशनाद्वारे भावकी व गावकीची भांडणे कोणाच्या मध्यस्थीमुळे समेट घडवून आणल्यास कधी एक होतील हे सांगता येत नाही. असाच एक विधायक प्रकार बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व गावातील पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने पिंपळी येथील शेतकऱ्यांच्यातील विकोपाला गेलेला वाद २० वर्षानंतर अखेर मिटल्याचे पाहायला मिळाले.
पिंपळीच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी शिंदे यांनी गावचा दौरा केला होता. दरम्यान पिंपळी गावातील नागरिकांना सूचना देत संबोधित करताना पिंपळी गावाकडे प्राधान्याने लक्ष देईल. गावाच्या अडीअडचणी गाव स्तरावर सोडवण्यासाठी कटिबद्ध राहु अशी ग्वाही दिल्यानंतर बरचसे वाद विकोपाला न जाता गाव पातळीवर मिटले गेले.
त्यातीलच एक शेतजमीनीचा वीस वर्षापूर्वींचा वाद समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक शिंदे यांचे सूचनेनुसार पंच कमिटीतील सदस्यांच्या मदतीने तुलसीदास केसकर व सर्जेराव पिसाळ आणि मच्छिंद्र पिसाळ या तिन्ही शेतकरी बांधवाना एकत्र विश्वासात घेऊन,बंधुभाव जपत बांधाचा वाद मिटवण्यासाठी विनंती केली. त्यास संबंधित शेतकऱ्यांकडून दुजोरा मिळाला व वीस वर्षपूर्वीचा वाद मिटवण्यासाठी सरपंच आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश मिळाले. बांधावरील वाद आनंददायी वातावरणात मिटल्यानंतर संबंधित शेतकरी व गावातील पदाधिकारी आदींनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व कोरोनाकाळात नागरिकांना सुरक्षा कवच देणाऱ्या शहर पोलीस स्टेशनचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना सॅनिटायजर भेट देऊन आभार मानले.