जनतेच्या हातातली शेवटची निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 12:59 AM2019-04-06T00:59:03+5:302019-04-06T01:02:44+5:30
आठवणीतील निवडणूक ...
अभय कुलकर्णी
जनतेनं हातात घेतलेली निवडणूक पत्रकार म्हणून अनेक लोकसभा व विधानसभा निवडणुका कव्हर करता आल्या. परंतु आठवणीतली निवडणूक आजही १९७७ चीच म्हणता येईल. त्या वेळचं भारावलेलं वातावरण आजही डोळ्यांसमोर लख्ख आहे. मी आठवीत होतो. मुळात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील की नाही, अशी शंका असताना त्या जाहीर झाल्या. आणीबाणीत १९ महिने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारी जनता निकराच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरलेली.
जनता पक्षाच्या झेंड्याखाली जनता एकवटली होती. जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी, मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव घेतले, तरी गर्दीत चैतन्य संचारत असे. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामींची पुण्यात शनिवारवाड्यावर अभूतपूर्व गर्दीची सभा झाली. निधीसाठी आवाहन झाले. कार्यकर्ते चादरी घेऊन गर्दीत फिरू लागले आणि नागरिक अंगठ्या, सोन्याच्या चेन्स, सोन्याच्या बांगड्या उत्स्फूर्तपणाने काढून देत होते. नाण्यांचा तर वर्षाव होत होता. जनता पक्ष नावाचा पक्ष अधिकृतपणाने स्थापनही झालेला नव्हता, पण पुण्यातून मोहन धारिया यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अक्षरश: हजारो कार्यकर्ते कामाला लागले. घराघरांत महिला स्लिपा लिहिण्याचं काम करत होत्या. खरंतर सबंध जनताच जनता पक्षाची कार्यकर्ता बनली होती. काँग्रेससकडे त्या वेळी गुंडांचा मोठा भरणा होता आणि सत्तेची सूत्रे ताब्यात होती, परंतु अनेक वस्त्यांत सामान्य माणसानं गुंडांच्या आरेला कारे करून उत्तर दिलं. काकाकुवा मॅन्शन हे जनता पक्षाचं कार्यालय होतं. ते चोवीस तास कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरून गेलेलं असे. रात्री शहरात अनेक तरुणांचे जत्थे घेऊन भिंती रंगवण्याची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने पार पाडत होते.
शहरात कोणत्याही नेत्याची सभा असो, हजारो लोक सभेच्या ठिकाणी धावत होते. ‘लोकसभेचा मानकरी’, ‘नांगरधारी शेतकरी’, नसबंदी के तीन दलाल इंदिरा, संजय, बन्सीलाल, अंधेरे में एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश या घोषणांनी पुणेच काय, देश दुमदुमत होता. मित्रांना, नातेवाइकांना पोस्टकार्ड पाठवून मतदानाचं आवाहन केलं जात होतं. अण्णा जोशी, भाई वैद्य, एस. एम. जोशी, रामभाऊ वडके, सुभाष सर्वगौड असे अनेक नेते शहरभर कॉर्नर मीटिंग्ज घेऊन वातावरण ढवळून काढत होते. परत काँग्रेस सत्तेवर येणं म्हणजे देशात हुकूमशाही प्रस्थापित होणं, याची खूणगाठ बांधलेला भारतीय मतदार सर्व ताकदीनिशी त्या निवडणुकीत उतरलेला अनुभवला. मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांना, जिथे बूथ लागले तिथे येऊन घराघरांतून जेवण आणून दिलं जात होतं.
मतमोजणीचा दिवस उजाडला आणि जनताजनार्दनाच्या ताकदीपुढे मस्तवाल सत्ता भिरकावली गेल्याचं चित्र दिसलं. जनतेनं हातात घेतलेली ती बहुधा पहिली आणि शेवटची निवडणूक होती. ती विसरणं अशक्य आहे.
(लेखक ज्येष्ठ संपादक आहेत )