अखेरचा प्रवास होणार सुखकर ; अंत्यविधीसाठी लागणारे मयत पासेस आता ऑनलाईन उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:58 PM2020-05-13T12:58:50+5:302020-05-13T13:02:38+5:30
पुण्याची लोकसंख्या सुमारे ४० लाखाच्या वर आहे. दर महिन्याला पुणे शहरात सुमारे तीन हजार नागरिक मरण पावतात...
पुणे : अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच्या पाससाठी करावी लागणारी धावपळ आता थांबणार असून, अंत्यसंस्कार करण्यासाठी ऑनलाईन पासेस आता उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या निर्णयामुळे शहरातील कुठल्याही रुग्णालयामध्ये एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास, त्याच हॉस्पिटलमधून महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या सुविधेची चाचणी पूर्ण झाली असून, लवकरच याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
पुण्याची लोकसंख्या सुमारे ४० लाखाच्या वर आहे. दर महिन्याला पुणे शहरात सुमारे तीन हजार नागरिक मरण पावतात. विविध धार्मिक रिवांजांनुसार शहारामध्ये जवळपास प्रत्येक भागात स्मशान आणि दफन भूमी आहेत. या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेच्या मयत पासेस महत्वाचे असतात.
महापालिकेच्यावतीने मागील काही वर्षात महापालिकेची रुग्णालये, क्षेत्रिय कार्यालये, ससून आणि विश्रामबाग वाडा येथे पासेस देण्याची व्यवस्था केली आहे. परंतू महापालिकेची काही रुग्णालये आणि क्षेत्रिय कार्यालये संध्याकाळी बंद झाल्यानंतर बरेचदा तेथे कर्मचारी नसल्याने नागरिकांना अगदी उपनगरातून विश्रामबाग वाडा अथवा ससून रुग्णालयात जावे लागते. वैकुंठ स्मशानभूमी मध्ये पासेस देण्याची व्यवस्था आहे. परंतू तेथेही रात्री दहा वाजल्यानंतर कर्मचार्या अभावी पासेस मिळत नाही. यामुळे रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कार करण्यात अडचणी आणि विलंब लागतो.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने मयत पासेस ऑनलाईन मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. शहरातील कुठल्याही हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाल्यास तेथूनच ऑनलाईन पाससाठी अर्ज करता येणार आहे. महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वैकुंठ, कैलास आणि येरवडा स्मशानभूमीमध्ये संगणक बसविण्यात आले आहेत. याठिकाणी असलेल्या कर्मचार्यांना हॉस्पीटलमध्ये भरलेला फॉर्म, फॉर्म क्रमांक व अन्य तपशील पाहता येणार आहेत. तसेच अन्य ठिकाणच्या स्मशानभूमी आणि दफन भुमीमध्येही कर्मचार्यांना ऑनलाईन पास पाहता येणार आहेत.
दरम्यान अनेकदा ज्येष्ठ नागरिक आणि काही व्याधींनी त्रस्त असणार्यांचा घरीच मृत्यू होतो. सद्यस्थितीत नगरसेवकांच्या पत्रावरुन अशा व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारांसाठी पासेस दिले जातात. परंतू आता घरीच मृत झालेल्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन पासेस देण्यासाठी नगरसेवकांचे पत्र अथवा डॉक्टरांनी दिलेले मृत्यूचे प्रमाणपत्र पाससाठी ऑनलाईन फॉर्म भरताना स्कॅन करून जोडण्याबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही कंदुल यांनी दिली.