शेवटच्या सोमवारी पीएमपी प्रवास मोफत

By admin | Published: December 22, 2016 02:48 AM2016-12-22T02:48:48+5:302016-12-22T02:48:48+5:30

शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हावी, नागरिकांनी दुचाकींचा वापर न करता जास्तीत जास्त बसमधून प्रवास करावा

Last Monday PMP travel free | शेवटच्या सोमवारी पीएमपी प्रवास मोफत

शेवटच्या सोमवारी पीएमपी प्रवास मोफत

Next

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हावी, नागरिकांनी दुचाकींचा वापर न करता जास्तीत जास्त बसमधून प्रवास करावा, यासाठी पुणेकरांना दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने १ कोटी ७० लाख रुपये पीएमपीला देण्याच्या प्रस्तावाला मुख्य सभेकडून मंजुरी देण्यात आली.
पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांना बस प्रवासाकडे आकर्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुणेकरांना मोफत बस प्रवास उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाकडे दिला होता. त्यांनी महिन्यातून दोनदा बस प्रवाशांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे प्रस्तावात म्हटले होते. मात्र, प्रशासनाने महिन्यातून एकदा मोफत प्रवास करण्याचा प्रस्ताव मांडला. मुख्य सभेने त्याला एकमताने मंजुरी दिली. (प्रतिनिधी)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
४बुधवारी झालेल्या मुख्य सभेत अनेक विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महिन्यातून एकदा मोफत बस प्रवास करू देण्याचा प्रस्तावही या वेळी मंजूर करण्यात आला.
४मात्र, ही योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली लोकप्रिय योजना न ठरता, तिचे योग्य नियोजन करून पुणेकरांना जास्तीत जास्त बस प्रवासाकडे वळविण्यासाठी त्याचा वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला असता, तो अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला. यावर महापालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्रायही नोंदविला होता. स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली होती.
आबा बागुल यांनी सांगितले, ‘‘रस्त्यावरील खासगी वाहने कमी करण्याच्या दृष्टीने महिन्यातून एकदा मोफत बसचा प्रयोग राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल. त्याचबरोबर, वाहनांमुळे होणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. प्रशासनाने या योजनेची सुविधा देताना त्याचे योग्य नियोजन करायला हवे. शहरात गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.’’

Web Title: Last Monday PMP travel free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.