श्री क्षेत्र वढू बुद्रुकचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात : नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:24 PM2019-04-05T19:24:38+5:302019-04-05T19:39:11+5:30
शंभूछत्रपतींच्या प्रेरणादायी इतिहासातून समाजातील प्रत्येक स्तरातील तरुणांनी प्रेरणा घेण्याची गरज: नवल किशोर राम
कोरेगाव भीमा : श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ हे राष्ट्रीय स्मारक असून,शंभूछत्रपतींच्या प्रेरणादायी इतिहासातून समाजातील प्रत्येक स्तरातील तरुणांनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगून शंभूराजांच्या स्मारक परिसराचा विकास आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार करून त्यास मान्यताही देण्यात आली असून येत्या काही दिवसांत वढू हे देशात आदर्श प्रेरणास्थान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३० वा बलिदानस्मरण दिन आज दि.५ एप्रिल रोजी झाला. सकाळी शासकीय पूजा जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी संदीप जठार, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पंचायत समिती सदस्या सविता पऱ्हाड, सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमाकांत शिवले, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, जिल्हा बँकेच्या संचालक निवृत्ती गवारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिवले, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, आदी उपस्थित होते. शंभूराजांच्या समाधीची शासकीय पूजा केल्यानंतर उपस्थितांनी शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पूजा केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय पूजेस आलेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांच्या वतीने शंभुप्रतिमा देऊन करण्यात आले.
या वेळी बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की, वढू बुद्रुक येथे शंभूराजांची समाधी असल्याने या परिसराचे मोठे महत्त्व आहे. या परिसराचा विकास करतानाच शंभूछत्रपतींनी ज्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेत सुराज्य निर्माण केले त्याच इतिहासातून प्रेरणा घेत आपणही समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन परिसराचा विकास करण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.