जिल्ह्यातील भातशेती अंतिम टप्प्यात
By admin | Published: November 7, 2016 01:19 AM2016-11-07T01:19:26+5:302016-11-07T01:19:26+5:30
पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते.
डिंभे : पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. सध्या येथील भातशेती अंतिम टप्प्यात आली आहे.
भातपिकाच्या यंदा उशिरा झालेल्या पेरण्या, त्यामुळे लागवडीसाठी झालेला उशीर. लागवडीनंतर अतिपावसामुळे सडू लागलेली भातशेती व त्यानंतर परतीच्या पावसाने भातउत्पादन क्षेत्रातून वेळेआधीच घेतलेला आखडता पाय, यामुळे यंदा भातकाढणीच्या हंगामाचे दिवस लांबत चालले आहेत. सध्या हळव्या जातीची काढणी चालू असली तरी गरव्या जातीची भातशेती अंतिम टप्प्यात एका पावसावाचून वाया गेली आहे. गरव्या जाती पावसाअभावी निसवल्याच नाहीत. यामुळे खाचरातील सुरगाड जमा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.
बहुतांश भागातील भातशेती ही संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आसल्याने जून, जुलैदरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात भात लागवडीची कामे सुरू असल्याचे पाहावयास मिळते. जुलै अखेरपर्यंत भातलागवडीची कामे उरकली जातात. लागवड केलेले भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालाधी लागतो. आॅक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्र तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम इत्यादी जातीच्या भातशेतीचा एक वेगळा सुगंध परिसरात दरवळत असतो. दसऱ्यादरम्यान थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे नाही म्हणायला हळव्या जातीच्या भातपिकास फायदा झाला. मात्र गरव्या जाती या वेळी नुकत्याच जोर धरू लागल्या होत्या. परंतु यंदा भात हंगामाच्या सुरूवातीस पेरणीपासून पावसाने दिलेल्या हुलकावण्या व त्यामुळे भातरोपे पेरण्यास उशीर झाला. पेरणीनंतरही पुढची भातशेतीच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाणारी नक्षत्रे कोरडी गेल्याने उगवून आलेली भातरोपे जळून गेली होती. उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी लागवडी उरकल्या खऱ्या परंतु कोवळे आवण व त्यानंतर पावसाने केलेली मुसळधार सुरूवात यामुळे भातखाचरे तुडुंब भरली. खाचरात लागड केलेले कोवळी भातरोपे सडून भातशेतीचे नुकसान होऊ लागले होते. त्यातच कशीबशी भातशेती वाचली.
फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली येथे अद्यापही काही खाचरांतील भातपीक हिरवेजर्द असून त्यास लोंबही धरल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी भातपीक काढावयास सुरूवात केली आहे त्यांच्या हाती केवळ पळंज लागत असल्याने यंदा आंबेगाव तालुक्यात भात उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट येणार आहे. या बाबत आहुपे खोऱ्यातील काही शेतकऱ्यांनी आंबेगाव तहसीलदारांना निवेदन दिले असून, पावसाअभावी वाया गेलेल्या भातशेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.