‘यशवंत’ कारखान्याची विक्रीप्रक्रिया अंतिम टप्प्यात
By admin | Published: April 27, 2015 11:46 PM2015-04-27T23:46:28+5:302015-04-27T23:46:28+5:30
थेऊर (ता.हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११७ एकर जमिनीची विक्रीप्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.
लोणी काळभोर : थेऊर (ता.हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११७ एकर जमिनीची विक्रीप्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. येणाऱ्या रकमेतून बँकेचे ३२ कोटी रुपये एवढ्या कर्जाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम कारखाना प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे पुणे शाखा व्यवस्थापक पी. एम. भुक्तर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कर्ज तसेच कथित भ्रष्टाचार यामुळे गेल्या चार हंगामात ‘यशवंत’ उसाचे गाळप करू शकला नाही. कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देणे, जमीन विक्री करून पुन्हा कारखाना सुरू करणे असे अनेक प्रयोग झाले. त्यानंतर आपल्या सुमारे ३२ कोटी कर्जाची वसुली करण्यासाठी राज्य बँकेने कारखान्यासह सर्व जमिनीचे गहाणखत असताना दि. २७ मार्च रोजी यशवंतच्या ११७ एकर जमिनीचा ताबा घेतला. जमिनीचे मूल्यांकन करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. प्राथमिक पाहणी करण्यासाठी आज राज्य बँकेचे पुणे शाखेचे व्यवस्थापक भुक्तर यांच्यासमवेत विभागीय अधिकारी प्रमोद देशमुख, मूल्यांकनकार गिरीश पवार, श्रीनिवासन आले होते. (वार्ताहर)
४जमिनीचे मूल्यांकन झाल्यानंतर बँकेच्या प्रशासकीय मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर विक्रीची जाहिरात देण्यात येणार आहे. यास सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
४त्यानंतर इतर प्रक्रियेसाठी एक महिना जाणार आहे. सध्या रेडी रेकनरप्रमाणे या परिसरातील जमिनीचा प्रतिएकरी दर सुमारे १ कोटी ४0 लाख रुपये आहे.
४या जमिनविक्रीमध्ये जो खरेदीदार राखीव किमतीपेक्षा जास्त किंमत देईल, त्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
४यशवंत आम्हीच सुरू करणार, अशी आश्वासने गेल्या चार वर्षांपासून ऐकून सुमारे 20 हजार सभासद व एक हजार कामगार कंटाळले आहेत. त्यामुळे आता त्यांचा राजकारणी नेतेमंडळींवर विश्वास राहिलेला नाही.
४यशवंत सुरू व्हावा व रोजीरोटीचा प्रश्न कायमचा मिटावा अशी सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे या विक्रीप्रक्रियेत आता काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.