कडधान्य पिकांची पेरणी शेवटच्या टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 07:19 PM2018-08-01T19:19:45+5:302018-08-01T19:41:01+5:30
राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ असून यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.
पुणे : राज्यात नंदूरबार,सोलापूर,औरंगाबाद व बीड जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील कडधान्य पिकांची पेरणीची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. सरासरी क्षेत्राच्या टक्केवारीचा विचार करता राज्यात उडीद पिकाची शंभर टक्क्याहून अधिक तर तूर, मुग, पिकांची ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात कडधान्या खालील सरासरी क्षेत्राच्या १८ लाख ९८ हजार ७८३ क्षेत्रावर कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे.
राज्याच्या कृषी विभागाने १ जून ते २७ जुलै या कालावधीतील पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यानुसार राज्यात आत्तापर्यंत सरासरी ५७९.४ मि.मी. पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात २५ ते ५० टक्के ६४ तालुक्यात ५० ते ७५ टक्के आणि १११ तालुक्यात ७५ ते १०० टक्के पाऊस पडला आहे.तर १७१ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यात ऊस पिक वगळून खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून २७ जुलैपर्यंत १२०.६६ लाख हेक्टर म्हणजेच ८६ टक्के क्षेत्रावर पेरणी व लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत.
राज्यात उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३ लाख १८ हजार ९५८ हेक्टर असून यंदा सरासरी पेक्षा अधिक ३ लाख ३४ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाची पेरणी झाली. तसेच राज्यात तूरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ असून आत्तापर्यंत ११ लाख ३० हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे मका पिकाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ३६ हजार ६६२ हेक्टर असून प्रत्यक्षात ७ लाख २३ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ असून यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. राज्यात २७ जुलैपर्यंत ३७ लाख ४८ हजार ७८३ क्षेत्रावर म्हणजेच १०५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. त्याचप्रमाणे राज्यात कापसाची ९२ टक्के पेरणी झाली असून आत्तापर्यंत ३८ लाख ६८ हजार ३८८ हेक्टर क्षेत्र कापसाच्या पेरणी खाली आले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
..................
पिकांवर किड-रोगाचा प्रादूर्भाव
राज्यात ठाणे विभागात काही ठिकाणी भात पिकावर पिवळ्या खोडकिडीचा, नाशिक विभागात काही ठिकाणी कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ज्वारी पिकावर खोडकिडीचा व सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या आळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. औरंगाबाद विभाग मका पिकावर खोडकीडीचा तर कापूस पिकांवर रस शोषणाऱ्याआळीचा तर सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. तसेच नागपूर विभागात काही भागात भाग पिकावर ‘पा’ रोगाचा तूर पिकावर मर रोगाचा आणि सोयाबीन पिकावर उंट अळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागात नमूद करण्यात आले आहे.