पुण्यात गेल्या सहा महिन्यात तीन हजार जोडप्यांचे 'शुभमंगल' नोंदणी पद्धतीने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 07:05 PM2021-07-11T19:05:47+5:302021-07-11T19:05:54+5:30
नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडेच जोडप्यांचा कल कायम
पुणे: शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल करून विवाह सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली असली तरी भव्यदिव्य विवाह करण्यावर खर्च करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडेच अद्यापही जोडप्यांचा कल कायम आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे मार्चचा निम्मा महिना, एप्रिल आणि मे मधील काही दिवस नोंदणी कार्यालय बंद राहिल्यामुळे तसेच अनेकांच्या नोकरी, व्यवसायावर गदा आल्याने नोंदणी विवाहावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे २०२० मध्ये नोंदणी पद्धतीने ५ हजार २२२ विवाह झाले. मात्र, अजूनही कोरोना आणि नोकरीच्या अस्थिरतेची टांगती तलावर असल्याने नोंदणी विवाहालाच जोडप्यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत नोंदणी पद्धतीने ३ हजार ६१२ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ पार पडले आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे विवाह समारंभावर अनेक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे पाचशे ते हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्यावर देखील बंधने आणली गेली. विवाहासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आल्याने एकाला बोलावले आणि दुस-याला नाही यातून नातेवाईक, मित्रमंडळी दुखावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडप्यांनी कोरोनाचे कारण पुढे करीत नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पसंती दर्शविली आहे. यातच विवाहाच्या बाबतीत येणा-या परवानग्यांच्या अडचणी, नियामवली आणि खर्च यामुळे जोडपी पैशांची बचत करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यातच निम्मे नोंदणी विवाह झाले आहेत.
विवाह नोंदणी अधिकारी डी.ए. सातभाई म्हणाले, यंदा नोंदणी पद्धतीने विवाह करणा-यांची संख्या वाढली आहे. आपल्या सोयीप्रमाणे आणि आपल्याला हवी ती तारीख निवडून जोडपी विवाहबद्ध होत आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे काही निर्बंध असल्यामुळे फक्त मे महिन्यात नोंदणी पद्धतीने विवाह करणा-यांची संख्या घटली. परंतु, जूनमध्ये पुन्हा ते प्रमाण वाढले . हे प्रमाण आणखी वाढेल असा अंदाज आहे. नोंदणी पद्धतीने विवाह करणा-साठीची प्रक्रिया खूप सुटसुटीत आहे. सध्या ५० जणांच्या उपस्थितीत विवाह करणा-याची परवानगी असली तरी नोंदणी पद्धतीने विवाह करणा-यांची संख्या घटलेली नाही