बारामतीत गेल्यावेळचा वचपा आता दिसलाच पाहिजे - महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:50 PM2019-04-19T18:50:17+5:302019-04-19T18:50:55+5:30
बारामतीत मागच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मात्र गेल्या बारचा वचपा दिसला पाहिजे असे मत रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
पुणे : बारामतीत मागच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मात्र गेल्या बारचा वचपा दिसला पाहिजे असे मत रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, खासदार संजय काकडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, बारामतीचा निकाल म्हणजे यावेळी। वोटींग स्ट्राईक असेल. ज्यांनी शाहू, फ़ुले, आंबेडकर यांच नाव घेऊन त्यांचा वारसा सांगतात त्यांनी मुलगी, पुतण्या, नातवाच्या पलीकडे काहीही बघितलं नाही. आम्ही सगळ्या मतदारसंघातून मतांचे लीड घेऊन येतो. फक्त बारामतीने आम्हाला "इक्वल" द्यावं अशी विनंतीही त्यांनी केलं.
बारामती लोकसभा मतदारसंघात मागील 2014 च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीकडून रासपचे अध्यक्ष महादव जानकर निवडणूक लढवत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी जानकरांनी तगडी टक्कर दिली होती. त्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सुप्रिया सुळे यांना प्रचंड मेहनत करावी लागली होती. त्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी कमळ चिन्हाऐवजी कपबशी चिन्हावर निवडणूक लढवली होती. जर जानकरांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली असती तर चित्र वेगळं असतं असं भाजपाकडून सांगण्यात येत होतं. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपा सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे.