दोन महिन्यात १०७ कोटींचा मिळकतकर थकबाकी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 09:15 PM2018-03-12T21:15:40+5:302018-03-12T21:15:40+5:30
थकबाकी दारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवणे, मिळकती जप्त करणे, मिळकतींना सील ठोकणे आदी विविध स्वरुपाची कारवाई सुरु आहेत. थकबाकी वसूलीसाठी सर्व परिमंडळासाठी स्वतंत्र वसूली पथकांची नियुक्त करण्यात आली आहे.
पुणे: महापालिका प्रशासनाकडे जास्तीत जास्त मिळकत कर वसूल करण्यासाठी आता अखेरचे पंधर दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे थकबाकीदारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवणे, मिळकती जप्त करणे, मिळकतींना सील ठोकणे अशा विविध प्रकारच्या कारवायांना वेग आला आहे. यामुळेच गेल्या दोन महिन्यात तब्बल १०७ कोटी रुपयांची कर वसूली केली आहे. नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधून आतापर्यंत ९ कोटी २६ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.
नोटबंदीमुळे जुन्या नोटा संपविण्यासाठी गतवर्षी शहरातील हजारो थकबाकीदारांनी लाखो रुपयांची थकबाकी भरून टाकली. यामुळे गत वर्षी मिळकत करातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळाले. महापालिकेच्या एकूण उत्पन्नामध्ये मिळकत कर हा उत्पन्ना प्रमुख स्त्रोत मानला जातो. यामुळे सन २०१७-१८ या वर्षांसाठी महापालिकेला मिळकत करातून १ हजार ८१६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होत. परंतु, आता अखेरचे पंधरा दिवस शिल्लक असताना केवळ ९९४ कोटी ४ लाख रुपयांचा मिळकतकर वसूल झाला आहे. थकबाकी दार करदात्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे अखेरच्या दिवसांत जास्ती जास्त कर वसूल करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यामध्ये थकबाकी वसूलीसाठी सर्व परिमंडळासाठी स्वतंत्र वसूली पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून थकबाकी दारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवणे, मिळकती जप्त करणे, मिळकतींना सील ठोकणे आदी विविध स्वरुपाची कारवाई सुरु आहेत.
महापालिका प्रशासनाकडून थकबाकी वसूलीची कारवाई अधिक कडक केल्याने १ जानेवारी ते २८ फेबुवारी २०१८ या दोन महिन्यांच्या कालावधीत १०७ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावातील १८ हजार १८५ मिळकतधारकांंनी ९ कोटी २६ लाख रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे.
---------------
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार कार्यालय
सन २०१७-१८ या अर्थिक वर्षांतील मिळकत कर वसूल करण्याची अखेरचे पंधरा दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी त्वरीत मिळकत कर जमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यात नागरिकांच्या सोयीसाठी पंधरा दिवसातील सर्व सार्वाजनिक सुट्टीच्या दिवशी देखील महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील व सर्व क्षेत्रिय कार्यालयामधील कर आकारणी व संकलन विभागाचे कामकाज सुरु ठेवण्यात येणार आहे. यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहमहापालिका आयुक्त विलास कानडे यांनी केले आहे.