अखेर खराडीतील नागरिकांची प्रतीक्षा संपली, सुरू होणार लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:33 PM2021-04-05T12:33:17+5:302021-04-05T12:34:30+5:30
पुरेशी जागा मिळत नसल्याने येत होती अडचण
अमोल अवचिते
पुणे: वडगावशेरी, खराडी भागात शहराच्या तुलनेत रुग्ण वाढीचा वेग अधिक आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. खराडीत महापालिकेचे लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र लसीकरण केंद्राला पुरेशी जागा मिळत नसल्याने अडचण येत होती. अखेर खराडीत यशवंत चौकातील महानगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या चार ते पाच दिवसात सुरू होणार आहे.
अनेक वेळा नागरिकांनी , सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींनी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. खराडीतील ज्येष्ठ नागरिक आणि आता ४५ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना वडगाशेरीतील महापालिकेच्या रुग्णालयात लस घेण्यासाठी जावे लागते. त्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. चाचणी करण्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
ऑनलाईन नोंदणी करूनही मिळत नाही लस
काही दिवसांपासून खराडीत खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ज्येष्ठांना दिसवभर रांगेत बसून रहावे लागते. अनेकवेळा वाद होत आहे. ४५ वयोगटाच्या वरील व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करून ही लस मिळत नाही. मात्र ३० ते ३५ वयोगटातील व्यक्तींना लस लगेच मिळते. लस घेण्यासाठी चकरा माराव्या लागतात. अशी तक्रार नागरिकांनी 'लोकमत' कडे मांडली. खराडीतील रक्षकनगर येथील पालिकेच्या जलतरण तलाव येथे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथेच स्वँब तपासणी केली जाते. मात्र दिवसाला केवळ १०० च व्यक्तींची तपासणी होत असल्याने नागरिकांना दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. पहाटे ५ वाजता रांगेत बसावे लागेल. पाहिल्या १०० जणांचे स्वँब घेतले जाते. त्यापुढील व्यक्तींना दुसऱ्या दिवशी बोलावले जाते. रविवारी चाचणी होत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. असे नागरिकांनी लोकमतला सांगितले.
खराडीतील यशवंत चौकातील महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. कोरोना सेंटर वर १५० चाचण्या करण्यात येत आहेत. हे चाचणी केंद्र शनिवारी किंवा रविवारी या एक दिवशी बंद असते.
सुहास जगताप, सहआयुक्त, नगररस्ता क्षेत्रीय कार्यालय.
आयुक्तांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार येत्या चार ते पाच दिवसात पालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू होईल. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे. ४५ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना येथे लस घेता येईल. तसेच कोरोना सेंटर वर १०० वरून १७५ व्यक्तींची स्वँब तपासणी करता येणार आहे.
- भैय्यासाहेब जाधव, नगरसेवक .