सरत्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांहून अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:23+5:302021-07-05T04:08:23+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार, पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास आणि हा आलेख उतरता राहिल्यास लाट ओसरते आहे किंवा ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार, पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास आणि हा आलेख उतरता राहिल्यास लाट ओसरते आहे किंवा साथ आटोक्यात येते आहे, असे मानले जाते. ३१ मे ते ६ जून या कालावधीत पॉझिटिव्हटी रेट ५.३६ टक्के इतका होत्या. त्यानंतर ७ ते १३ जून (४.६७), १४ ते २० जून (४.८२), २१-२७ जून (४.७०) असा दर नोंदवला गेला. तिन्ही आठवडे दर ५ टक्क्यांहून कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. त्यानंतर २८ जून ते ४ जुलै या कालावधीत हा आलेख पुन्हा ५ टक्क्यांच्या वर गेला आहे. दुसरीकडे डेल्टा प्लस विषाणूने चिंतेत आणखी भर घातली आहे.
शहरातील दररोजच्या मृत्यूची संख्याही दररोज ५ ते ७ इतकी नोंदवली जात आहे. आठवड्याभरात कोरोनामुळे ४०-४२ रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांची संख्याही आटोक्यात येणे गरजेचे असल्याचे मत वैद्यक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोजच्या बाधित रुग्णांची संख्या २००-२५० इतकी नोंदवली जात होती. सरत्या आठवड्यात ३० जून रोजी ५०८, ३ जुलै रोजी ३४४, तर ४ जुलै रोजी ३१७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
पुणे जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील नमुनेही पाठवले जात आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. आयएलआय आणि सारीच्या रुग्णांचेही सर्वेक्षण केले जात आहे. लसीकरणानंतर पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाची पुन्हा लागण झालेल्यांची तपासणीही करण्यात येत आहे.
------
आठवडा चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी
७ - १३ जून ३९,८८५ १८५८ ४.६७
१४-२० जून ३६,१३९ १७४२ ४.८२
२१-२७ जून ३६,८०८ १७३० ४.७०
२८ जून-४ जुलै ३९,८८८ २१४८ ५.३८