गतवर्षी कोविडवर केवळ ८० कोटींचा खर्च; तर २७ कोटी आरोग्य योजनांवर खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:59+5:302021-07-08T04:09:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : शासनाचा खूप मोठा निधी कोविडवर खर्च झाल्याने किंवा खर्च होत असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : शासनाचा खूप मोठा निधी कोविडवर खर्च झाल्याने किंवा खर्च होत असल्याने विकासकामांवर खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सर्वच यंत्रणेकडून बोलले जात आहे. परंतु राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुणे जिल्ह्यात गतवर्षी कोविडवर केवळ ८० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तर २७ कोटी आरोग्याच्या विविध योजनांवर खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गतवर्षी मार्च महिन्यातच पुण्यासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे संकट आले. यामुळेच एप्रिल २०२० मध्ये नवीन आर्थिक वर्षे सुरू झाल्यानंतर शासनाने जास्तीत जास्त निधी कोविड आजार व त्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर खर्च करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. गतवर्षी पुणे जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या ६७५ कोटी रुपयांचे बजेटपैकी १६ टक्के निधी कोविडसाठी राखीव ठेवण्यात आला होता. परंतु यापैकी केवळ ८० कोटी रुपयेच कोरोनावर खर्च करण्यात आला. शिल्लक २७ कोटी इतर आरोग्य योजनांवर खर्च करण्यात आला.
दरम्यान, वार्षिक योजना सन २०२१-२२ च्या आराखड्यातील ३० टक्के निधी कोविड १९ आजार उपाययोजना करीता खर्च करणे बंधनकारक केले आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा निधी अर्थसंकल्पित करणे, तरतुदीचे वितरण व प्रशासकीय मान्यता प्रदान करणे (स्थानिक स्वराज्य संस्था वगळून) तसेच पुनर्विनियोजन करणे इत्यादीबाबतचे अधिकारदेखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षात २०८ कोटी रुपये कोरोनावर खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा आणि रेमडेसिविर व अन्य औषधांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळेच प्रशासनाने तातडीने नवीन ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली. तसेच कोविड व पोस्ट कोविड रुग्णांना आवश्यक निधी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आला. यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा नियोजनमधून ३३ कोटी ३८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आता शिल्लक निधीदेखील कोविड उपाययोजना व आरोग्याच्या इतर योजनांवर खर्च करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.