सरते वर्ष सांस्कृतिक विश्वासाठी ’कसोटी’चं ठरलं....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:40+5:302020-12-31T04:11:40+5:30
पुणे : ‘पुणे’ ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. परंतु कोरोनाच्या आठ ते नऊ महिन्यांच्या काळात कलेने समृद्ध असलेल्या या ...
पुणे : ‘पुणे’ ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. परंतु कोरोनाच्या आठ ते नऊ महिन्यांच्या काळात कलेने समृद्ध असलेल्या या शहराची जणू रयाच गेली. एरवी विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीने आणि रसिकांच्या गर्दीने फुलणारी सभागृहं, सांस्कृतिक कट्टे सर्व ओस पडले. मनाला प्रफुल्लित करणाऱ्या कलाकारांच्या सर्जनशील अविष्कारांनी सजलेली कलादालनं, उन्हाळी सुट्टीत वाचनाचा आनंद द्विगुणित करणारी ग्रंथप्रदर्शनं, भारतीय अभिजात संगीत विश्वातील दिग्गज कलाकारांच्या अद्वितीय सूराविष्कारांची मेजवानी देणारे सांगीतिक महोत्सव, या सर्वांनाच ‘ब्रेक’ लागल्याने सांस्कृतिक नगरीतला जिवंतपणाच हरवला.
पुस्तकनिर्मिती; ग्रंथव्यवहार ठप्प
वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठी दरवर्षी राज्यभरात उन्हाळी सुट्यांसह दिवाळी दरम्यान आयोजित होणारी जवळपास दोनशे ग्रंथप्रदर्शने कोरोनामुळे थांबली. राज्यातील शासकीय तसेच अनुदानित ग्रंथालये व वाचनालये बंद ठेवण्यात आल्याने वाचन चळवळ आणि ग्रंथालयातील आर्थिक व्यवहाराला देखील खीळ बसली. याशिवाय दरवर्षी महिन्याला 200 पेक्षा जास्त पुस्तकांची होणारी निर्मिती प्रक्रिया रखडली. यातच दिवाळी अंकांना कोरोनामुळे फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून प्रकाशक आणि संपादकांनी यंदा अंकांच्या प्रती कमी काढण्यावर भर देण्यात आला. अनेकांनी ‘डिजिटल’ अंकांकडे मोर्चा वळविला. ओटीटी वर चित्रपट, वेबसिरीजला कंटाळलेल्या लोकांनी वाचनाला पसंती दिल्याने ‘ऑनलाइन’ पुस्तक खरेदीला मागणी वाढली. ही सरत्या वर्षातील प्रकाशन व्यवसायाकरिता दिलासा देणारी बाब ठरली.
महोत्सवांना ‘पॉझ’
सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित केलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात आयोजित केला जातो. मात्र कोरोनाच्या सावटामुळे हा महोत्सव घेण्याचे धाडस आयोजकांनी केले नाही. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु.ल देशपांडे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित होणारा ‘पुलोत्सव’ देखील पुढे ढकलण्याची वेळ आयोजकांवर आली.
एकंदरच कोरोना काळ हा सांस्कृतिक विश्वासाठी कसोटी पाहाणारा ठरला. सरत्या वर्षातील गडद आठवणी दूर होऊन नवे वर्ष कला क्षेत्रासाठी चैतन्यदायी आणि आनंदायी ठरो अशीच सर्वांचीच अपेक्षा आहे! ----------------------------------------------