लतादीदींचा सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील; पुण्यातून कलाकारांची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 07:29 PM2022-02-06T19:29:14+5:302022-02-06T19:30:04+5:30

लता दीदींच्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली असून आकाशातील एक दैदीप्यमान तारा निखळला

lata mangeshkar tune and his contribution will always be remembered forever tribute to artists from pune | लतादीदींचा सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील; पुण्यातून कलाकारांची श्रद्धांजली

लतादीदींचा सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील; पुण्यातून कलाकारांची श्रद्धांजली

Next

पुणे : लताजींचा आवाज, सादरीकरण यामुळे शास्त्रीय संगीतात आवाजाचा पोत, लालित्य भाव अशा गोष्टींकडे कलाकार अधिक लक्ष देऊ लागले होते. स्वरांची अचूकता, गोडवा, शब्दांचे उच्चारण आणि भावसंगीताचे गायन कसे असावे, याच्या त्या कुलगुरू होत्या. लतादीदींचा स्वर हा दैवी होता. त्यामुळे त्यांचं गाणं कधी आणि कुठे ऐकले तरी हृदयापर्यंत पोहोचायचे. पण लता दीदींच्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली असून आकाशातील एक दैदीप्यमान तारा निखळला आहे. लतादीदींचा सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील. अशा भावना व्यक्त करत पुण्यातील कलाकारांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. 

लताजींच गाणं हे ख-या अर्थानं भारताचं रत्न

लताजींचा आणि माझा प्रत्यक्ष असा फारसा संबंध आला नाही. पण त्यांच्या आवाजामुळे  त्या सत्त माझ्याबरोबर आहेत. संगीताच्या क्षेत्रात नकळत माझं पाऊल पडलं होतं. त्या काळात ज्या कलाकारांचे माझ्यावर संस्कार झाले.त्यात बडे गुलाम अली खॉं, सिनेनटी नूरजहॉं तशाच लताजीही होत्या. संगीत प्रस्तुतीमध्ये आवाजाचं माध्यम कसं असायला हवं. याची जाणीव या कलाकारांच्या स्वरांनी मला करून दिली. आवाजाची फेक, शब्दांचे उच्चार, भावनिर्मिती अशा कितीतरी गोष्टींचा त्यामुळे मी विचार करायला लागले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संगीत ही मुळात एक कला आहे. ते केवळ शस्त्र नाही. हे धान्यात घ्यायला हवं. शास्त्रीय संगीत हे शास्त्र दाखवण्यासाठी नसतं. तिथे राग सौंदर्याच दर्शन होणं अपेक्षित असतं. लताजींचा आवाज, सादरीकरण यामुळे शास्त्रीय संगीतात आवाजाचा पोत, लालित्य भाव अशा गोष्टींकडे कलाकार अधिक लक्ष देऊ लागले आहेत. लताजींच गाणं हे ख-या अर्थानं भारताचं रत्न आहे -  डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका

आकाशातील एक दैदीप्यमान तारा निखळला 

माझी आणि लता दीदीं ची पहिली भेट पुण्यातच झाली. माझे गुरु पं. बिरजूमहाराज यांना पं. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळणार होता. त्यावेळी लतादीदींनाभेटण्यासाठी महाराज जी मला ही सोबत घेऊन गेले.संपूर्ण मंगेशकर परिवार एकत्र जमला होता. आशा ताई, मीना ताई, उषाताई, पं.हृदयनाथ मंगेशकर अशी चारही भावंडे उपस्थित होती.  महाराज जीं नी माझी लता दीदींशी ओळख करुन दिली. लता दीदींना मी महाराष्ट्रीयन आहे हे कळल्यावर त्यांनी माझी विशेष आस्थेने चौकशी केली.मी नृत्य शिकतो हे पाहून  त्यांनी माझे कौतुक केले. लतादीदींना पुणे म.न.पा. चा भारतरत्न भीमसेन जोशी पुरस्कार देण्यात येणार होता. मी त्या वेळी सितारा देवीं च्या हस्ते लता दीदीं ना पुरस्कार देण्याचे सुचवले. त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. मी सितारा देवींना पुण्यात बोलावले. त्यांना घेऊन संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचलो. सितारा दीदीं च्या हस्ते लता दीदीं ना पुरस्कार देण्यात
आला. लता दीदीं च्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. आकाशातील एक दैदीप्यमान तारा निखळला आहे. जोपर्यंत गाणे आहे तोपर्यंत लता दीदी आपल्यात सदैव रहातील- डॉ.पं.नंदकिशोर कपोते, प्रसिद्ध जेष्ठ कथक नर्तक

लताजींच्या संगीतामुळे अनेक पिढ्यांचे कान घडले

भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत ऐकतच आमची, आमच्या आधीची व नंतरच्या पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांचे संगीत हे जीवनाचा अविभाज्य घटक होते. माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी व त्यांचा ४० च्या दशकापासून परिचय होता. तेव्हा दोघांचाही संघर्षाचा काळ होता. लता मंगेशकर यांनी त्यानंतर त्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्या आमच्या घरी येत. त्यांच्या पुणे, मुंबई इथल्या घरी जाण्याचे भाग्य मला लाभले. १९९१- ९२ च्या सुमारास मी काही मराठी अभंगांचे संगीत दिग्दर्शन केले होते, हे अभंग माझे वडील पं. भीमसेन जोशी यांनीच गायले होते. त्या वेळी लता मंगेशकर यांची भेट झाली होती. त्यांनी सकल संत गाथेची प्रत स्वत: साक्षरी करून मला भेट दिली होती. स्वरांची अचूकता, गोडवा, शब्दांचे उच्चारण आणि भावसंगीताचे गायन कसे असावे, याच्या त्या कुलगुरू होत्या. त्यांच्या संगीतामुळे अनेक पिढ्यांचे कान घडले. माझ्या व कुटुंबियांच्या वतीने  ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!- श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ

लतादीदी आठवणी आणि गाण्यांमधून त्या सदैव आपल्यात राहतील

लतादीदींच्या जाण्याने आयुष्य ख-या अर्थाने पोरकं झालं आहे. मायेची उब हरवल्याची जाणीव आज होत आहे. गेले काही दिवस त्या आजारी होत्या आणि त्यांच्या निधनाची बातमी आली.  तेव्हा ते सत्य स्वीकारणं कठीण होतं. परंतु, काही गोष्टी अटळ असतात आणि त्या स्वीकाराव्या लागतात. तसंच लतादीदींचं जाणं आता मनाला स्वीकारावं लागतंय.  आपल्या घरात लहानपणापासून वडिलधा-यांचा सहवास जसा महत्त्वपूर्ण असतो.  संगीतक्षेत्रात तेच अमूल्य महत्त्व लतादीदींचे होते. संगीतक्षेत्रातील माऊली सगळ्यांना पोरकं करून गेली. त्यांचं स्थान, योगदान, त्यांची गाणी कायम स्मरणात राहतील. त्या देहरुपातून गेल्या आहेत मात्र, आठवणी आणि गाण्यांमधून त्या सदैव आपल्यात राहतील. त्यांचे स्वर कायम सोबत राहतील- राहुल देशपांडे, गायक, संगीतकार

लतादीदी अत्यंत महान व्यक्तिमत्त्व

लतादीदींचा सुरुवातीचा काळ कोल्हापुरात गेला आणि नंतर त्या मुंबईला आल्या. कोल्हापुरात असताना लतादीदी आणि आमचे घरच्यासारखे संबंध होते. मी विद्यार्थी दशेत असतानाचा तो काळ होता. आमचे काका दत्ताराम भाटवडेकर सिनेमातील असल्याने जयप्रभा स्टुडिओमध्ये त्यांचं येणं जाणं होतं. तर माझे दुसरे काका पांडुरंग भाटवडेकर हे लतादीदींचे स्वीय सहायक होते. त्यामुळे आमच्या घरगुती लग्नसमारंभात लतादीदी तसेच मंगेशकर कुटुंबीय नेहमी हजेरी लावत. त्यामुळे आमच्या घरचं जवळचं माणूस गेल्याचं दु:ख आहे. दोन वर्षपूर्ती जेव्हा हृदयनाथ मंगेशकरांना विद्यापीठात आमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांनीही दीदींनी घेतलेल्या जबाबदारीमुळे आमचं संपूर्ण कुटुंब उभं राहिल्याचं सांगितलं होतं. अत्यंत महान व्यक्तिमत्त्व. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अशी माणसं एकदाच पृथ्वीतलावर होऊन जातात

लतादीदींचे जाणे ही नि:शब्द करुन टाकणारी घटना आहे. त्या या जगात नाहीत हे स्वीकारण्यास मन तयार होत नाही. लतादीदींचा स्वर हा दैवी होता. त्यामुळे त्यांचं गाणं कधी आणि कुठे ऐकले तरी हृदयापर्यंत पोहोचायचे, भिडायचे. कुठल्याही प्रकारचे गाणे असले तरी त्यातला भाव श्रोत्यांपर्यंत पोचायचा. अशी माणसं एकदाच पृथ्वीतलावर होऊन जातात. त्यांच्याकडून आर्शिवादपर मिळालेली गोष्ट म्हणजे ह्यबालगंधर्वह्ण चित्रपटाबद्दल त्यांनी ट्विट केले होते. त्यांनी तो चित्रपट पाहिला आणि त्यांनी ट्विटद्वारे माझे आणि सुबोध भावे, सगळ्या टीमच्या कामाचे कौतुक केले. ती कौतुकाची थाप कायम लक्षात राहील. त्यांचा सूर आणि त्याचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील.  - आनंद भाटे, गायक

लतादीदींनी गाणी म्हणायला सुरूवात केल्यानंतर त्यांचं गाणं मनाला भिडायचं

ज्यांना गानसम्राज्ञी म्हणतो त्या आज आपल्यात नाहीत. त्यामुळे आजचा खरोखरच वाईट दिवस  आहे. सुरूवातीच्या काळात संगीत क्षेत्रात मी वादक म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे 40 ते 50 वर्षे त्यांचा सांगीतिक सहवास लाभला. संगीतकार कुणीही असो पण लतादीदी असल्या तर वातावरण प्रसन्न असायचे. त्यांनी नुसतं गाणी म्हणायला सुरूवात केल्यानंतर त्यांचं गाणं मनाला भिडायचं. संगीतकार म्हणून आपलं एकतरी गाणं असाव की ते लतादीदींनी
गावं. तस झाल तर मी धन्य झालो असतो. असं कायम वाटायचं. ’मिले सूर मेरा तुम्हारा’ च्या वेळी हा योग जुळून आला. त्या स्टूडिओ मध्ये आल्या आणि त्यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड केले. तो दिवस माझ्यासाठी इतका अविस्मरणीय होता की आता काही नको असे वाटले. निर्माता म्हणाला की लतादीदी मिळत नाहीयेत तर काय करायंच तेव्हा कविता कृष्णमूर्ती कडून डमी गाऊन घे, मग दीदी आल्या की फायनल करू. त्यांनी लतादीदीला कविता कृष्णमूर्तीचे गाणे पाठवले. त्यांना ते खूप आवडले. पण तुमच्या आवाजात हवंय असं म्हटल्यावर  ‘बघूया जमतंय का’ असं त्या खट्याळपणे म्हणाल्या. मला गाऊन दाखवा म्हणाल्या आणि मला एसीमध्ये घाम फुटला. मग दुसरा टेक ओके झाला. त्या खूष होऊन गेल्या. केंद्र सरकारकडून दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला याचाही आनंद आहे. लतादीदींना कुणीही विसरू शकणार नाही. आज एका संगीतयुगाचा अंत झाला आहे- अशोक पत्की, संगीतकार

Web Title: lata mangeshkar tune and his contribution will always be remembered forever tribute to artists from pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.