लतादीदी फोनवरून म्हणाल्या... पायावर डोके ठेवून करते नमस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:12 AM2021-07-30T04:12:15+5:302021-07-30T04:12:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस २९ जुलै. गुरुवारी बाबासाहेबांनी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस २९ जुलै. गुरुवारी बाबासाहेबांनी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केले. स्वत: बाबासाहेब त्यांचा वाढदिवस तिथीने म्हणजेच नागपंचमीला साजरा करतात. यंदा १३ ऑगस्टला नागपंचमी आहे. पण बाबासाहेबांच्या शतकाचे कौतुक एवढे की त्यांच्या देशविदेशातल्या चाहत्यांनी गुरुवारीच (दि.२९) सकाळपासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. चाहत्यांच्या प्रेमाचे ओझे एवढे झाले की थकलेल्या वृद्ध बाबासाहेबांना रात्री साडेनऊनंतर चक्क झोपण्याचे औषध देऊन निजवण्यात आले.
पहाटे साडेपाचला बाबासाहेबांचा दिवस सुरू झाला. त्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांच्या घरचा फोन खणखणू लागला. सकाळच्या रामपाऱ्यातच रुद्रपठण करून पुरोहितांनी बाबासाहेबांसाठी निरोगी दीर्घायुष्य चिंतले. सकाळी साडेसहापासूनच बाबासाहेबांच्या घरचा फोन खणखणू लागला. त्यांच्या घरी असणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाचे, सहकाऱ्यांचे मोबाईल दिवसभर अखंड किणकिणत राहिले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या विविध राज्यांतून एवढेच काय परदेशातूनही बाबासाहेबांचे अभीष्टचिंतन करणारे फोन येत राहिले. प्रत्येकाला बाबासाहेबांशी किमान चार शब्द तरी बोलायचे होते. स्वत: बाबासाहेब न थकता, प्रत्येकाशी संवाद साधत राहिले.
‘गानसम्राज्ञीं’च्या शुभेच्छा आणि मुख्यमंत्र्यांचा फोन बाबासाहेब पुरंदरे आणि मंगेशकर कुटुंबीय यांच्यातील जिव्हाळा नात्यापलीकडचा आहे. मंगशेकर भावडांमधील प्रत्येकाने म्हणजे लतादीदींपासून ते आशा (भोसले), उषा, मीना (खडीकर) आणि हृदयनाथ या सर्वांनी बाबासाहेबांशी दूरध्वनीवरून बातचित केली. लतादीदी त्यांना फोनवरच म्हणाल्या, “पायावर डोके ठेवून नमस्कार करते आणि तुमची तब्येत उत्तम राहो अशी प्रार्थना करते.” “तुम्ही आम्हाला ११० वर्षे असावे असे वाटते. तोपर्यंत मीही असेन,” अशी मिश्किल भावनाही लतादीदींनी व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून अनेकांनी दूरध्वनीवरून बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या. नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, नितीन देसाई यांनी बाबासाहेबांशी संपर्क साधला. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यापासून अनेक आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना भेटून त्यांचे अभीष्टचिंतन केले. सकाळपासूनचा हा शुभेच्छांचा वर्षाव रात्री साडेनऊपर्यंत अथक चालू राहिला. शंभरीतल्या या शिवशाहीराला दिवसभरात विश्रांतीसाठीही सवड मिळाली नाही. अखेरीस झोपेचे औषध देऊन त्यांच्या वाढदिवसाची सांगता करण्यात आली.
चौकट
...आणि तरुणीने केले बाबासाहेबांना निरुत्तर
“एका व्याख्यानमालेसाठी मुंबईत गेलो होतो. व्याख्यानानंतर काॅलेजमधील मुलगी जवळ येऊन मला म्हणाली, ‘तुम्ही शिवचरित्र खूप छान सांगता, पण छत्रपतींच्या कुठल्या गोष्टींचे अनुकरण करता का?’ तिच्या प्रश्नाने मी चक्रावलोच. मला काही सुचले नाही. मी म्हटले ‘याचे उत्तर मी तुम्हाला नंतर देतो.’ त्यानंतर मी बराच विचार केला की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांचे आपण अनुकरण करतो. छत्रपती आपल्या रक्तात नसानसांत भिनायला हवेत. तेव्हापासून आजपर्यंत मी छत्रपतींप्रमाणे माझ्या जीवनात दिलेला शब्द आणि दिलेली वेळ या दोन्ही गोष्टी आयुष्यभर काटेकोरपणे पाळत आलो आहे. अहंमपणा बाळगू नका. नेहमी हसत राहा. आईवडिलांची सेवा करा. सर्वांवर प्रेम करा. शिवचरित्र वाचा, शिवचरित्र तपासा, शिवचरित्राचे अनुकरण करा,” असा संदेश शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपली शतकी मजल गाठताना दिला.