पुणे पालिकेला उशिराने सुचले शहाणपण : टँकरसंबंधीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:02 PM2019-05-14T12:02:21+5:302019-05-14T12:08:56+5:30
साडेतीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना टँकरसंबंधी हेल्पलाईन सुरु करण्याचे ‘शहाणपण’ सुचले आहे.
पुणे : टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचे जादा दर आकारले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे पालिकेने अशा तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळा सुरु झाल्यापासूनच शहराच्या उपनगरांसह ग्रामीणच्या हद्दीलगतच्या भागामधून टँकरची मागणी येऊ लागली होती. एप्रिल महिन्यात तर सर्वाधिक टँकरची मागणी झाली. एवढा साडेतीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना हेल्पलाईन सुरु करण्याचे ‘शहाणपण’ सुचले आहे. अर्थात अजूनही हा निर्णय धोरणात्मकच असून प्रत्यक्षात हेल्पलाईन अस्तित्वात यायला आणखी किती वेळ लागणार याचे उत्तर अंधारात अहे.
खासगी टँकर चालकांकडून नागरिकांची पिळवणूक सुरु असून गरजू नागरिकांची लूट चालू आहे. नाईलाजास्तव पुणेकर लागेल तितके पैसे मोजून पाणी विकत घेत आहेत. मात्र या संदर्भातल्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी महापालिकेने कोणतेही व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले नाही. आता उन्हाळा संपण्यास जेमतेम पंधरवडा राहिल्यानंतर टँकर दराबाबतच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन चालू करणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गेले तीन महिने टँकर माफियांचे चांगलेच फावले आहे.
पाण्याबाबतचे दरपत्रक पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि टँकर भरण्याच्या केंद्रांवर लावण्यात येणार आहे. पालिकेकडून देण्यात येणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर नागरिक तक्रारी करु शकणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही हेल्पलाईन सुरु होण्यासाठी आणखी किती दिवस लागतील हे स्पष्टपणे सांगता येत नाही. गेले तीन महिने पालिकेने अशा प्रकारे जादा दराने पाणी विकणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी यंत्रणा का राबविली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हेल्पलाईन सुरु झाल्यानंतरही टँकरधारकांवर कारवाई होईल की हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.
चौकट
टँकर माफिया आणि राजकारण्यांचे साटेलोटे
सातत्याने भासणाºया पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात टँकर माफिया तयार झाले आहेत. यातल्या अनेकांना राजकीय वरदहस्त आहे, तर काही ठिकाणी राजकारण्यांचे स्वत:चे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचेच टँकर आहेत. महापालिकेच्या पाण्याची चोरी, चढ्या दराने पाणी विकून पुणेकरांची लुट या प्रकारांवर महापालिका प्रशासनाने कडक कारवाई केल्याचे आजवर दिसलेले नाही.