पुणे: सिंचन भवनातून ‘कामाची’ही गळती लेट लतिफ कारभार : सकाळी दोन तास उशिरापर्यंत येतात अधिकारी-कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 07:11 AM2017-12-22T07:11:32+5:302017-12-22T07:12:58+5:30
जलसंपदा विभागाला केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पाझर फुटलेला नसून, येथील कर्मचारी आणि अधिका-यांनी कामचोरीचा पायंडा पाडत एक ‘आदर्श’ भ्रष्ट आचार घालून दिला आहे. जलसंपदाचे महत्त्वाचे ठाणे असलेल्या सिंचन भवन येथील कार्यालयात वर्ग एकच्या अधिका-यांपासून कर्मचा-यांपर्यंत कोणीही वेळेवर कार्यालयात पाय ठेवत नसल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले आहे. कार्यालयीन वेळेनंतर तब्बल दोन तासांनी येणा-या या ‘लेट लतिफांनी’ राज्यसराकारच्या बायोमेट्रिकलाही ‘अंगठा’ दाखविल्याचे दिसून येत आहे.
विशाल शिर्के
पुणे : जलसंपदा विभागाला केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पाझर फुटलेला नसून, येथील कर्मचारी आणि अधिका-यांनी कामचोरीचा पायंडा पाडत एक ‘आदर्श’ भ्रष्ट आचार घालून दिला आहे. जलसंपदाचे महत्त्वाचे ठाणे असलेल्या सिंचन भवन येथील कार्यालयात वर्ग एकच्या अधिका-यांपासून कर्मचा-यांपर्यंत कोणीही वेळेवर कार्यालयात पाय ठेवत नसल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले आहे. कार्यालयीन वेळेनंतर तब्बल दोन तासांनी येणा-या या ‘लेट लतिफांनी’ राज्यसराकारच्या बायोमेट्रिकलाही ‘अंगठा’ दाखविल्याचे दिसून येत आहे.
जलसंपदा विभागातील महत्त्वाची सर्व कार्यालय पुण्यातील सिंचन भवन येथे आहे. कार्यकारी संचालक कृष्णा खोरे महामंडळ, मुख्य अभियंता (विनिर्दिष्ट प्रकल्प), मुख्य अभियंता (जलसंपदा), मुख्य अभियंता कोयना स्थापत्य व गुणनियंत्रण, अधिक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ, अधिक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ, अधिक्षक अभियंता दक्षता विभाग, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग ही कार्यालये येथे आहेत. त्यातील कुकडी, पुणे पाटबंधारे आणि खडकवासला पाटबंधारे ही कार्यालये थेट शेतकºयांशी, पाणीवाटप संस्था तसेच औद्योगिक वसाहतींच्या पाणी पुरवठ्याशी या कार्यालयांचा थेट संबंध येतो. नियमानुसार सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ अशी अधिकारी आणि कर्मचाºयांची वेळ आहे. शिपायांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, काही सन्माननीय अपवाद वगळता सिंचनभवनचे तीनही मजले दुपारी बारापर्यंत जवळपास रिकामेच असल्याचे आढळून आले.
लोकमत प्रतिनिधीने गुरुवारी
(दि. २१) आणि गेल्या आठवड्यातील दोन दिवस सकाळी १० ते दुपारी
१२ या वेळेत या कार्यालयाची पाहणी केली. त्यात काही वर्ग एकचे
अधिकारी देखील तास ते दीड तास उशीराने कार्यालयात येत असल्याचे दिसून आले.
कोयना मुख्य अभियंता (जलसंपदा) आणि कृष्णा खोरे कार्यकारी संचालक या कार्यालयांची अवस्था तुलनेने बरी होती. मात्र, सर्वच मजल्यावरील बहुतांश कार्यालये सकाळी सव्वादहा वाजता देखील पूर्ण मोकळी होती.
त्याच कार्यालयांत साडेअकरापर्यंत देखील कोणीच पाऊल ठेवले नव्हते. तेथे वेळेवर आलेल्या एका कर्मचाºयाशी संवाद साधला असता, असे चित्र दररोज पाहायला मिळते, असे त्याने सांगितले.
जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यालयात अशी स्थिती असेल, तर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कशी परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बायोमेट्रिकचे होते काय?-
1 इतर सरकारी कार्यालयाप्रमाणे सिंचन भवन येथे देखील बायोमेट्रीक प्रणाली बसविण्यात आली आहे. त्याद्वारेच कर्मचाºयांच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळा बोटाच्या ठशाद्वारे नोंदविल्या जातात. असे असतानाही कार्यालयीन वेळ सकाळी दहाची असताना साडेअकरा ते बाराच्या दरम्यान देखील अगदी वर्ग एकचे अधिकारी देखील हजेरी नोंदविताना दिसून आले. बायोमेट्रिक असतानाही वेळेच्या बाबतची अधिकारी आणि कर्मचाºयांची बेफिकीरी आश्चर्यजनक आहे.
2येथील एका कर्मचाºयाशी संवाद साधला असता, त्याने ज्या वेळी मुख्य अभियंता बाहेर असतील, त्या वेळी आणखी गंभीर परिस्थिती असल्याचे सांगितले. तो हळू आवाजात म्हणाला, साहेबलोकच (वर्ग एक) उशीरा येतात, त्यामुळे कर्मचारी देखील तसेच वागतात. त्या प्रमाणे येथे काम करण्यात येते. मात्र, कर्मचारी उशीरा कामाला येतात आणि घरी मात्र वेळेतच जातात, अशी पुस्तीही त्या कर्मचाºयाने जोडली.