आरोग्य विभागाच्या परीक्षेत उमेदवारांना दिली उशिरा प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:14 AM2021-03-01T04:14:18+5:302021-03-01T04:14:18+5:30
पुणे: आरोग्य विभागातील लिपिक व इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी रविवारी राज्यात विविध जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ ...
पुणे: आरोग्य विभागातील लिपिक व इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी रविवारी राज्यात विविध जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. पुण्यात काही केंद्रांवर साधारणपणे अर्धातास परीक्षा उशिरा सुरू झाली. तर मराठवाडा, कोकण, विदर्भ या ठिकाणी एकाच बाकावर दोन विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका फुटणे असे प्रकार घडल्याने पुन्हा एकदा सरळसेवा भरती वादात सापडली असल्याचे समोर आले आहे.
राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी निवडलेल्या एजन्सीच्या माध्यमातून रविवारी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी दोन जिल्ह्यातील परीक्षा केंद्र दिले होते. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज भरून सुध्दा सर्व पदांसाठी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे या परीक्षेचा प्रामाणिकपणे अभ्यास करणा-या उमेदवारांचे मोठे नुकसान झाले असून शासन आमच्या आयुष्याशी खेळत आहे,अशा भावना अनेक उमेदवारांनी व्यक्त केल्या.
औरंगाबादमध्ये मोबाईलद्वारे उत्तरे सांगणारे रॅकेट पकडण्यासह डमी उमेदवार बसविणे, एका बाकावर दोन उमेदवार बसविणे, बाकावर परीक्षा क्रमांक नसणे असे प्रकार नाशिक, रत्नागिरी, नागपूर, नगर आदी जिल्ह्यांमध्ये घडले. संपप्त विद्यार्थ्यांनी या घटनांचे व्हिडिओ व्हायरल केले. काही केंद्रांवर परीक्षा उशिरा सुरू होत असल्याने उमेदवारांनी गोंधळ घातला. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर पोलिसांना पाचारण करावे लागले.
एमपीएससी स्टुडंट राइट्सचे महेश बडे म्हणाले, राज्यातील अनेक ठिकाणी आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाला असून ही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नसल्याचे दिसून येते. महापरीक्षा पोर्टलसारख्या खासगी एजनसीद्वारे परीक्षा घेतल्याने गोंधळ होत असल्याचा अनुभव शासनाकडे असताना पुन्हा एजन्सीलाच परीक्षेचे काम देणे योग्य नव्हते. त्यामुळेच गेल्या दोन वर्षापासून सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घ्यावी,अशी मागणी केली जात आहे.
-----------------------------------