कालौघात नाट्य व्यवसायाचे स्वरूप बदलले
By admin | Published: June 26, 2017 03:44 AM2017-06-26T03:44:20+5:302017-06-26T03:44:20+5:30
महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा ‘बालगंधर्व पुरस्कार’ मनोरंजन नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर कुलकर्णी (अण्णा) यांना जाहीर झाला आहे.
महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा ‘बालगंधर्व पुरस्कार’ मनोरंजन नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर कुलकर्णी (अण्णा) यांना जाहीर झाला आहे. त्यांनी जवळपास पन्नास वर्षे नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. शहरात नाट्यगृहांची उभारणी झाल्यानंतर नाट्यप्रयोग, आॅर्केस्ट्रा, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. आजवर नाटकांमध्ये हौसेपोटी भूमिका केल्या. महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर झाल्याचा आनंद नक्कीच आहे, अशा भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. बालगंधर्व रंगमंदिराचा सुवर्णमहोत्सवी सोहळा ही अनेक आठवणींना उजाळा देणारी घटना आहे. १९६१ मध्ये अनंत जाधव महानगरपालिकेचे सहायक आयुक्त असताना पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालगंधर्व रंगमंदिराची पायाभरणी झाली. २६ जून १९६८ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते रंगमंदिराचे उद्घाटन झाले. या वेळी आचार्य अत्रे, पं. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार असे दिग्गज कलाकार उपस्थित होते. बी. जी. शिर्के यांनी रंगमंदिराचे बांधकाम केले होते. उद्घाटनानंतर संपूर्ण जुलै महिना अत्रे थिएटर्सची ‘डॉक्टर’, ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’ अशा नाटकांचे आलटून पालटून प्रयोग होत होते. या सर्व नाटकांचे व्यवस्थापन करण्याचे भाग्य मला लाभले. त्या वेळी मनोरंजन नाट्यसंस्थेची स्थापना झाली नव्हती. १९६९ मध्ये संस्था नावारूपाला आली.
ते म्हणाले, ‘मी १९५०पासून नाट्यसृष्टीत कार्यरत होतो. सरस्वती मंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सरस्वती मंदिर नटसंघाची स्थापना केली होती. त्या वेळी मी ‘संगीत म्युन्सिपाल्टी’, ‘पराचा कावळा’ आदी नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनने ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक राज्यस्पर्धेमध्ये सादर केले. त्यानंतर त्या नाटकाचे चार प्रयोग झाले. पुढे या नाटकावरून वाद झाला आणि नाटक कंपनीतून अनेक जण वेगळे झाले. त्यानंतर १९७० मध्ये थिएटर अॅकॅडमी सुरू करण्यात आली. या कंपनीच्या सर्व नाटकांची व्यवस्था मनोरंजन नाट्यसंस्थेकडे होती. ‘पडघम’, ‘तीन पैशांचा तमाशा’ अशा नाटकांचेही अनेक प्रयोग झाले. सुयोग, कलावैभव, नाट्यसंपदा या सर्व नाटक कंपन्यांचे व्यवस्थापन मनोरंजनकडे होते. मी सरकारी नोकरीमध्ये रात्रपाळी करून मनोरंजन नाट्यसंस्थेचा व्याप सांभाळण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने अनेक कलाकारांशी संबंध प्रस्थापित झाले. रंगभूमीची सेवा करण्याची यानिमित्ताने संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.
नाट्यव्यवसाय हा अत्यंत चमत्कारिक व्यवसाय आहे. ऐंशीच्या दशकात या व्यवसायात काम करणारे अनेक जण व्यसनाधीनतेच्या आहारी गेले. त्यामुळे अनेक जण व्यवसायापासून दूर गेले. पूर्वीच्या तुलनेत आता नाट्यव्यवस्थापन सोपे झाले आहे. केवळ बुकिंग करणे म्हणजे व्यवस्थापन नव्हे. पूर्वी आम्ही सायकलवरून हिंडत. छपाई करणे, बोर्ड रंगवणे, वर्तमानपत्रांना जाहिरात नेऊन देणे, अशी सर्व कामे आम्ही करायचो. फोन, इंटरनेट आल्यानंतर, ही सर्व धावपळ संपली. शहराचा विस्तार झाला, नाट्यगृहांची संख्या वाढली त्याप्रमाणे नाट्यव्यवसायाचे स्वरूपही बदलले. पूर्वी मनोरंजन नाट्यसंस्थेतर्फे वासंतिक नाट्यमहोत्सव आयोजित केला जात असे. खुल्या नाट्यगृहाच्या माध्यमातून नाटके सादर केली जात असत. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी झाल्यावर हा महोत्सव बंद करण्यात आला.’
आजकाल रसिकांची नाटकाबाबतची अभिरुची बदलली आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने नाटकांकडे वळण्याची गरज आहे. पूर्वी ‘हॅम्लेट’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’ अशा पूर्वीच्या नाटकांचे प्रयोग पुन्हा झालेच नाहीत. अभिनय, गायन यांचे प्रमाणही कमी झाले आहे. आजकाल बोलीभाषेतील नाटके जास्त चालतात. नाटकांच्या माध्यमातून तरुण आणि मुलांच्या आवडीचे विषय हाताळण्याची गरज आहे. नाट्यव्यवस्थापन क्षेत्रातील प्रवासाचा वेध घेणारे लिखाण मी वि. भा. देशपांडे यांच्या ‘एनसायक्लोपीडिया’ यामध्ये प्रसिद्ध झाला. भविष्यात शक्य झाल्यास या प्रवासाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.