लातूरमधील रुग्णांसाठी खाकी वर्दीला फुटला पाझर..!

By Admin | Published: April 10, 2016 04:12 AM2016-04-10T04:12:52+5:302016-04-10T04:12:52+5:30

मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा रुग्णालयांनाही बसत आहेत. रुग्णांची तहान भागविण्यासाठी ‘१९८९’च्या तुकडीमधील पोलीस निरीक्षक पुढे सरसावले असून, लातूरच्या शासकीय रुग्णालयाला

Latur patients khaki uniform crippled ..! | लातूरमधील रुग्णांसाठी खाकी वर्दीला फुटला पाझर..!

लातूरमधील रुग्णांसाठी खाकी वर्दीला फुटला पाझर..!

googlenewsNext

- लक्ष्मण मोरे,  पुणे

मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा रुग्णालयांनाही बसत आहेत. रुग्णांची तहान भागविण्यासाठी ‘१९८९’च्या तुकडीमधील पोलीस निरीक्षक पुढे सरसावले असून, लातूरच्या शासकीय रुग्णालयाला महिनाभर पाणी पुरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
‘प्रिय मित्रांनो, आपल्या राज्यात आणि विशेषत: लातूरमध्ये पाण्याचे फार हाल आहेत. पाण्यासाठी अक्षरश: डोकी फुटत आहेत. लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाण्याविना रुग्णांचे हाल होत आहेत. सर्वांचा प्रश्न आपण सोडवू शकत नसलो तरी या रुग्णांना औषधापेक्षा असलेली पाण्याची चिंता तर आपण दूर करू शकतो. ‘आपण खारीचा वाटा उचलू या.’ असा मेसेज पोलीस निरीक्षकांच्या १९८९ च्या तुकडीच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर २ एप्रिल रोजी पडला होता. नागपूरच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक संजय पांडे यांनी हा मेसेज टाकला होता.
सोलापूरमध्ये कार्यरत असलेल्या निरीक्षक नाना कदम यांनी ही कल्पना उचलून धरली. या तुकडीच्या २०० अधिकाऱ्यांशी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. प्रत्येकाने दर महिन्याला एक हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यासाठी लातूरमध्येच नेमणुकीस असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांच्या खात्यावर सर्वांनी पैसे जमा करायचे ठरले. नांदेडचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनीही पुढाकार घेत रुग्णांना किती पाणी लागेल, त्यासाठी किती खर्च येईल, याचा अंदाज घेतला. पंढरपूरचे निरीक्षक किशोर नावंदे यांनी ओळखीमधून मिनरल वॉटरच्या उत्पादकाशी संपर्क साधला. त्यांनी स्वस्तामध्ये पाणी देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे १५ एप्रिलपासून लातूरच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांना पिण्यासाठी ‘मिनरल वॉटर’ मिळणार आहे.
पुण्यामध्ये नेमणुकीस असलेल्या निरीक्षक अनिल पाटील, श्रीकांत नवले, धनंजय धुमाळ, एम. एम. मुजावर, रघुनाथ फुगे, सुनील पवार, अरुण वायकर, संजय कुरुंदकर, संजय पाटील, कल्याण पवार, अनिल आडे, बाळासाहेब सुर्वे, संजय
निकम, बळवंत काशीद, विष्णू जगताप आणि भागवत, मिसाळ यांच्यासह राज्यामध्ये विविध ठिकाणी नेमणुकीस असलेल्या या तुकडीच्या अधिकाऱ्यांनीही या उपक्रमात पुढाकार घेतला आहे.

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर सहज ‘चॅटिंग’ करताना सुचलेली कल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. सोशल मीडियाचा वापर करून चांगला सामाजिक उपक्रम राबवता येऊ शकतो, हेसुद्धा या अधिकाऱ्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले आहे.

सध्या मराठवाड्यात दुष्काळामुळे फारच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पोलीस अधिकारी असलो तरी समाजाचा एक घटक आहोत. सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून समाजाचे देणे ‘पाणी’ देऊन फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
- अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणीविरोधी पथक, पुणे

Web Title: Latur patients khaki uniform crippled ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.