कला उत्सवात हसत-खेळत अक्षरांची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:22 AM2018-08-27T02:22:37+5:302018-08-27T02:23:03+5:30
प्रात्यक्षिकांना प्रतिसाद : राष्ट्रभक्तीपर गीते; अभंग-पोवाडा, अपंग सैैनिकांचे बासरीवादन
पुणे : अक्षरलेखन विषयावरील प्रात्यक्षिक बघण्यासाठी लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील मंडळी उपस्थित होती. अक्षरलेखनाच्या शाळेमध्ये राष्ट्रभक्तिपर गीते, अभंग, पोवाडा यांच्या सादरीकरणासह अपंग सैनिकाच्या बासरीवादनासह, कलाकारांबरोबर उपस्थितांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. अच्युत पालव यांनी सगळ्याला साजेसे अक्षरलेखन केले. हसत-खेळत अक्षरांच्या नव्या ओळखीने अच्युत पालव यांचा तास रंगला.
विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदन यांच्यावतीने प्रथमच पुणे आर्ट पुणे हार्ट या कला उत्सवाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे करण्यात आले आहे. यावेळी पालव यांनी वंदे मातरम, अबीर गुलाल, शिवाजी महाराज, गणपती या नावांची नव्याने अक्षरओळख उपस्थितांना करून दिली. आयोजक चेतन धोत्रे, स्वप्निल नाईक, विजय महामुलकर उपस्थित होते. अच्युत पालव म्हणाले, ‘अक्षरे बघण्यासाठी असतात, केवळ लिहिण्यासाठी नसतात. अक्षरांमध्ये एक जादू असते. भारत हा लिपीप्रधान देश आहे. प्रत्येक भाषेचे एक वेगळे सौंदर्य आहे. आपल्या देशातील लिप्यांचे पर्यटन झाले तर भाषा आणखी गोड दिसेल, असे सांगत त्यांना आलेले अनुभवदेखील उपस्थितांसमोर उलगडले.