ते पार्सल माझ्यासाठी होते ऐकल्यावर हसू आले : संजय नहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:14 PM2018-03-24T21:14:01+5:302018-03-24T21:14:01+5:30
अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा स्फोट झाला होता.या पार्सलवर काश्मीर आणि ईशान्य भारतातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांचे नाव होते.
पुणे : अहमदनगर येथील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात स्फोट झालेले पार्सल माझ्यासाठी आलेले होते हे ऐकल्यावर पहिल्यांदा हसू आल्याची प्रतिक्रिया सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी व्यक्त केली. लोकमत कार्यालयातील वार्तालापात त्यांनी ही माहिती दिली. अहमदनगर येथे कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा २० मार्च २०१७रोजी स्फोट झाला होता.या पार्सलवर संजय नहार यांचे नाव होते. ते पार्सल तुमच्यासाठी आले आहे हे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया काय होती असे विचारल्यावर नहार यांनी हसू आल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले की,मला पंजाबला कार्यक्रमासाठी जायचं होत.पण अचानक या पार्सलंच कळलं. सुरुवातीला हसून झाल्यावर मला भीती वाटते का याची मी वाट बघितली. पण असं काहीही झालं नाही आणि त्यामुळेच मी भगतसिंगांसारख्या क्रांतीकारकांचे नाव घेण्यास योग्य आहे याचीही मला खात्री झाली.अर्थात त्यामुळे जवळच्या मित्र परिवाराला काळजी वाटली हेदेखील त्यांनी कबूल केले. पार्सल कोणी पाठवले याचा अंदाज नसला तरी ज्याला माझे काम थांबायचे होते त्याने पाठवले असेल तर त्याच्या या कृतीमुळे माझे काम दुप्पट मोठे झाले असल्याचेही ते म्हणाले. त्या व्यक्तीने कदाचित चिठ्ठी मला चिठ्ठी पाठवली आणि तुमचे काही मुद्दे मला पटत नाही म्हणून हे पाऊल उचलत आहे असे सांगितले तर निदान संबंधित व्यक्तीचा उद्देश तरी समजला असता असेही ते म्हणाले. यापूर्वीही २०१२-१३साली धमकीची पत्रे आली होती. पण निवडलेला रस्ता असा आहे की अशा घटना घडणारच असेही मत त्यांनी व्यक्त केले.याशिवाय त्यांनी पहिल्यांदा त्यांना पुरवण्यात आलेल्या पोलीस संरक्षणचीही आठवण सांगितली. ते म्हणाले की,प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी दहशतवाद्यांचे वकीलपत्र घेवू नये म्हणून त्यांना कॉलेजमध्ये असताना आमचा गट विनंती करत होता. त्यांनी त्याची दखल न घेतल्याने आम्ही आंदोलन केले. आम्हाला पोलिसांनी अटकही केली आणि जेठमलानी यांच्या सांगण्यानुसार सोडूनही दिले. पण त्यानंतर खलिस्तानवाद्यांकडून धमकीचे पत्र आले आणि पहिल्यांदा दोन गनमॅनची सुरक्षा पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्कुटरवरून कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्याला सुरक्षा पुरवण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते असेही त्यांनी नमूद केले.