पुण्यामध्ये ई-१०० प्रकल्पाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:11+5:302021-06-06T04:09:11+5:30
पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि पर्यावरण, वन आणि ...
पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुण्यात ई-१०० प्रकल्पाची सुरुवात केली.
पंतप्रधानांनी भारतातील इथेनॉल ब्लेंडिंग २०२०-२०२५ साठी आराखड्याबाबतच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालाचे या वेळी प्रकाशन केले. या वेळी पंतप्रधानांनी देशभरात इथेनॉलचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी ई-१०० या महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाचा पुण्यामध्ये प्रारंभ केला. ‘चांगल्या पर्यावरणासाठी जैवइंधनांना प्रोत्साहन’ ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नरेंद्र सिंग तोमर, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
भारताने इथेनॉल क्षेत्राच्या विकासाचा सविस्तर आराखडा सादर करून आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. इथेनॉल हे २१ व्या शतकातील भारतासाठी प्राधान्याच्या घटकांपैकी एक बनले आहे, असे ते म्हणाले. इथेनॉलवर भर दिल्यामुळे पर्यावरणावर चांगला परिणाम होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंग करण्याचे लक्ष्य २०२५ पर्यंत साध्य करण्याचा सरकारचा निर्धार आहे. यापूर्वी हे लक्ष्य २०३० पर्यंत निर्धारित करण्यात आले होते. ते लक्ष्य साध्य करण्याचा कालावधी आता आणखी पाच वर्षांनी कमी करण्यात आला आहे. २०१४ पर्यंत सरासरी केवळ १.५ टक्के इथेनॉल ब्लेंडिंग होत होते ते आता ८.५ टक्क्यांवर गेले आहे. २०१३-१४ मध्ये देशात सुमारे ३८ कोटी लिटर इथेनॉल खरेदी केले जात होते. आता त्याचे प्रमाण ३२० कोटी लिटरपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. इथेनॉल खरेदीमध्ये झालेल्या या आठपट वाढीमुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
रेल्वे विद्युतीकरणावर भर
आज देशातील रेल्वे जाळ्याच्या मोठ्या भागाचे विद्युतीकरण झाले आहे. देशातील विमानतळही सौरऊर्जेपासून निर्माण वीज वापरण्यासाठी वेगाने अद्ययावत केले जात आहेत, याबाबत पंतप्रधानांनी विस्ताराने समजावून सांगितले.