मुळशी धरणातील लाँच बंद, ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून होडीने करावा लागतो प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:49 AM2019-02-05T00:49:38+5:302019-02-05T00:50:32+5:30
मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे.
पौड - मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने धरणाच्या आतील नागरिकांना रोज ये-जा करण्यासाठी मागील तीस वर्षांपासून लाँच सुरु करण्यात आली आहे. ही लाँच अनेकदा वेगवेगळ्या कारणाने बंद असते. कधी या लाँचचा यांत्रिक बिघाड, कधी चालकाचा अभाव तर कधी निसर्गाची अवकृपा त्यामुळे या भागातील नागरिकांचे दळणवळण खंडित होऊन त्यांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. पूर्वीचे एक चालक निवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी एक कंत्राटी चालक नियुक्त केला होता. त्याला कमी पगार असल्याने व तोही वेळेवर मिळत नसल्याने त्याने कंटाळून राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही लाँच गेल्या अनेक दिवस बंद आहे.
याबाबत माहिती देताना येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ म्हणाले की, लाँच बंद असल्यामुळे या भागातील वाघवाडी, वडगाव, शिरगाव, भादसखोंडा, वडुस्ते, वांद्रे, लिंबारवाडी, भीमनगर, पिंपरी, मोहरी या दहा गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामध्ये शाळकरी मुले, महिला व दररोज कामासाठी धरणाखाली पौड, पुणे येथे मजुरीसाठी जाणारे कामगार असे शेकडो लोक दररोज ये-जा करतात. यातील अनेकांना पोहताही येत नाही. सध्या ही मंडळी पर्याय म्हणून एका छोट्याशा बोटीतून येजा करतात. मुळशी धरणाची खोली प्रचंड असल्याने त्यातून या बोटीने हा प्रवास अत्यंत असुरक्षित पद्धतीने केला जातो. मागील काही वर्षांत अन्य धरणांमध्ये बोटी उलटून दुर्घटना घडलेल्या आहेत. ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असून, चालकाअभावी लाँच अद्यापही बंदच आहे.
यापूर्वी नादुरुस्तीच्या कारणाने उभ्या असलेल्या प्रत्येकी २० लाख रुपये किमतीच्या दोन लाँचला जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे जलसमाधी मिळाली. यात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले.
याबाबत वाघवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ यांनी या भागातील ग्रामस्थांच्या सह्यांचे लाँच त्वरित सुरु करण्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेला दिले आहे. लाँच सुरु न झाल्यास असुरक्षितपणे होडीतून प्रवास करताना दुर्घटना घडल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पौड पंचायत समिती येथे मागील आठवड्यात पाणीटंचाई आढावा बैठकीसाठी आल्यानंतर जि. प. अध्यक्ष विश्वास देवकाते यांना भेटून धरण भागातील नागरिकांनी आपली अडचण सांगितली होती. तरीही अद्याप लाँच सुरु झाली नसल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी धरण भागातील नागरिक पौड पंचायतीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषदेला दिले आहे.
- अर्चना सुभाष वाघ,
सरपंच वडगाव-वाघवाडी.