हास्याच्या कारंज्यात ‘पुणेरी पाट्या’ प्रदर्शन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:14 AM2018-06-24T03:14:17+5:302018-06-24T03:14:19+5:30
प्रदर्शनाचे उद्घाटन म्हणजे एरवी धीरगंभीर कार्यक्रम.
पुणे : प्रदर्शनाचे उद्घाटन म्हणजे एरवी धीरगंभीर कार्यक्रम. पण ‘पुणेरी पाट्या’ प्रदर्शनाचे उद्घाटन आणि सर्वच मान्यवरांनी मनाला भिडलेल्या पाट्यांचे सादरीकरण केले आणि हास्याच्या कारंज्यात ‘लोकमत’च्या वतीने आयोजित पुणेरी पाट्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
‘लोकमत’च्या वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर हिमोथेरपी क्लिनिक आणि खत्री बंधू पॉट आईस्क्रिम व मस्तानी यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणेरी पाट्या’ प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी यशवंतराव चव्हाण कलादालनात झाले. महापौर मुक्ता टिळक, आमदार अनंत गाडगीळ, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, महाराष्टÑ साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, त्रिदल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, संवाद पुणेचे सुनील महाजन, पृथ्वी एडिफाईसचे अभय केले, खत्री बंधूचे गिरीश खत्री, रूद्रा लेसर हिमोथेरपी क्लिनिक्सच्या स्मिता निगडे या वेळी उपस्थित होत्या.
पाट्यांमधून ‘जुने पुणे’ पाहत असल्याची अनुभूती मिळत असल्याचे सांगून ‘लोकमत’च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे महापौर मुक्ता टिळक यांनी कौतुक केले.
रामदास फुटाणे यांच्या हातात माईक आला आणि पुण्यातील पाट्यांची उदाहरणे त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि सभागृहात हास्याची कारंजी उडू लागली.
‘प्रशासनावर नाही अंकुश,
काय करतील काकडे
जागोजागी खड्डेच खड्डे,
पाऊल पडते वाकडे’
या एकेकाळी पुण्यात गाजलेल्या पाटीची जन्मकथा सांगताना फुटाणे म्हणाले, ‘‘अंकुश काकडे यांच्या महापौरपदाच्या काळात पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले होते. दुचाकीची अंत्ययात्रा काढण्यासाठी पाटी देण्याची विनंती आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. काकडे यांना जेवढी प्रसिद्धी महापौर म्हणून मिळाली नाही तेवढी या पाटीने दिली.
फुटाणे म्हणाले, ‘पुणेरी पाट्यां’चा उगम पुणे ३० येथून झाला आहे. या भागात एक तरी सायकलवाला आणि समीक्षक राहायचा. रशियाच्या पंतप्रधानांना उपदेश करण्याची क्षमताही पुणेकरांमध्ये आहे. ‘पाटी’ हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे.
अनंत गाडगीळ यांनी पुणेरी पाट्यांची खासियत सांगितली. पुणे स्टेशनवर ‘कृपया इथे फुकट वाचू नये’ अशी पाटी लिहिली होती. या पाटीचा हेतू विचारला तर डेक्कन-प्रगतीचे प्रवासी प्रवासी रोज दहा-दहा पाने वाचतात आणि मासिक संपवून टाकतात, असे त्यांनी सांगितले. अभिरूची गार्डनमध्ये एक पाटी वाचायला मिळाली, ‘येथे वैचारिक संघर्ष टाळावा, तात्विक मतभेद झाल्यावर व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही’. पुणेरी पाटी लिहिताना पुणेकरांचा दुखावण्याचा हेतू नसतो, याकडे गाडगीळ यांनी लक्ष वेधले.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, पुण्याच्या सांस्कृतिक अभिजाततेचे दर्शन पुणेरी पाट्यांमधून घडते. पुण्यात ज्याचा आरंभ होतो त्या गोष्टी
देशभरात प्रसिद्ध होतात, असे म्हटले जाते. मात्र, पुणेरी पाट्यांचा उगम
पुण्यात होऊनही महाराष्ट्राला
त्याचा स्वीकार करता आला नाही. त्यावर पुण्याचीच मक्तेदारी राहिली. या पाट्यांमधून उपहास, अहंकार झळकत असला तरी कल्पनाशक्तीचेही प्रतिबिंब त्यामध्ये पाहायला मिळते. तुच्छता नाही पण सर्जनशीलता सापडते. आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, रोजरी ग्रुप आॅफ एज्युकेशनचे संचालक विनय आºहाना, गिरीश मुरुडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली.