स्वामीनारायण मंदिराचे लोकार्पण
By Admin | Published: February 20, 2017 03:04 AM2017-02-20T03:04:40+5:302017-02-20T03:04:40+5:30
पुण्यातील मुंबई-बेंगळुरू महामार्गावर आंबेगाव बुद्रुक येथे २७ एकरच्या विस्तीर्ण परिसरात स्थापन करण्यात आलेल्या भगवान श्री
पुणे : पुण्यातील मुंबई-बेंगळुरू महामार्गावर आंबेगाव बुद्रुक येथे २७ एकरच्या विस्तीर्ण परिसरात स्थापन करण्यात आलेल्या भगवान श्री स्वामीनारायण मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मूर्तींची प्रतिष्ठापना बीएपीएस स्वामीनारायण सत्संग मंडळाचे प्रमुख महंत स्वामीमहाराज यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात पार पडला. लाखो भाविक मंदिर परिसरात उपस्थित होते.
मंदिराच्या गर्भगृहात श्री स्वामीनारायण, अक्षरब्रह्म गुणातीतानंद स्वामी, श्री हरी कृष्ण महाराज, श्री राधा कृष्ण देव, श्री घनश्याममहाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नीलकंठ अभिषेक मंडपात श्री नीलकंठवर्णी महाराज व गुरुपंरपरांच्या मूर्तींसह विठ्ठल-रुक्मिणी, संत श्री ज्ञानेश्वरमहाराज, तुकाराममहाराज, एकनाथमहाराज, तसेच शिव-पार्वती, गणपती, सीता-राम-हनुमान, श्री लक्ष्मीनारायण देव, श्री बालाजी या मूर्तींची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर लोकार्पण सोहळा करून स्वामीनारायण मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त भव्य नगर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मयूररथ सजवण्यात आला होता. मयूररथामध्ये श्री अक्षरपुरुषोत्तममहाराज, कळशरथावर घनश्याममहाराज, मुक्तीरथावर नीलकंठवर्णीमहाराज, छात्ररथावर हरिकृष्णमहाराज, बासरी-मोरपीसरथावर राधाकृष्ण देव, गजरथावर प्रमुखस्वामीमहाराज, हिमालयरथावर गणपती व हनुमान, अर्जुनरथावर विठ्ठल रुक्मिणी, मुक्त हस्तरथावर बालाजी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या मुर्त्यांचा समावेश होता. ही शोभायात्रा गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथून सुरू झाली. शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती मंदिर, बाजीराव रोड, शिवाजी रोड असे सुमारे ५ किलोमीटरचे परिक्रमण करीत शोभायात्रेचे पुन्हा स्वारगेट येथे आगमन झाले.
(प्रतिनिधी)