नीराची लचकेतोड सुरूच
By admin | Published: January 4, 2017 05:19 AM2017-01-04T05:19:54+5:302017-01-04T05:19:54+5:30
इंदापूरच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या नीरा नदीची वाळूमाफियांकडून दररोज लचकेतोड होत आहे. पात्रामधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशामुळे नीरा नदी
बारामती / निरवांगी : इंदापूरच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या नीरा नदीची वाळूमाफियांकडून दररोज लचकेतोड होत आहे. पात्रामधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशामुळे नीरा नदी आता अस्तित्वासाठी झगडू लागल्याचे चित्र आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता आहे. त्यामुळे येथील वाळूमाफिया कोणत्याही यंत्रणेस भीक घालीत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तालुक्यातील नीरा नृसिंहपूर येथे येणार आहेत. येथील नदीपात्राची परिस्थितीही फार वेगळी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथील प्रशासनाला काय आदेश देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
इंदापूर तालुक्यातून उद्धट, तावशी, कुरवली, कळंब, निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरा-नृसिंहपूर या गावांमधून नीरा नदी वाहते. इंदापूर तालुक्याबरोबरच माळशिरस तालुक्यातीलही अनेक शेतकऱ्यांना नीरेच्याच पाण्याचा आधार असतो. मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशाचा परिणाम पात्रातील पाणीसाठ्यावर देखील होत आहे. तर ज्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाही अशा ठिकाणच्या वाळूउपशामुळे भूजलपातळीही मोेठ्या प्रमाणात घटू लागली आहे. तसेच अगदी बंधाऱ्याच्या भिंतीलगतच वाळूउपसा होत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी बंधाऱ्यांनादेखील धोका पोहोचला आहे. उपसा केलेली वाळू वाहतूक टिपर व ट्रॅक्टरमधून बीकेबीएन रस्त्याने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था होत आहे. दररोज लाखो रुपयांची माया वाळूमाफियांना मिळत आहे. या वाळूमाफियांवर महसूल विभागाची ठोस अशी कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
नीरेच्या पाण्यावर येथील शेतकऱ्यांनी फळबागा, चारा पिकांची लागवड केली आहे. मागील वर्षीच्या तीव्र दुष्काळामध्ये येथील शेतकरी भरडला गेला होता. जनावरांना चारा घालण्यासाठी शेतकऱ्यांना खिसे रिकामे करावे लागत होते. उन्हाळ्यामध्ये नदीला धरणातून पाणी सोडले जाईल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे सध्याच्या चारा पिकांवर पुढील उन्हाळी हंगाम परिसरातील शेतकऱ्यांना काढावा लागणार आहे. मात्र शासकीय कार्यालयातील ‘खाबूगिरी’मुळे दिवसाढवळ्या वाळूउपसा सुरू असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
प्रशासनातील घरभेद्यांमुळेच वाळूमाफिया चोरी करून उजळमाथ्याने फिरत आहेत, असा आरोपही येथील शेतकऱ्यांनी केला आहे. तातडीने या अवैध वाळू उपशावर कारवाई करावी,
अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.